नाशिकः नाशिकमध्ये कोरोनाच्या लसीकरण (Corona Vaccination) नोंदणीमध्ये मोठा घोळ झाला असून गल्लीत गोंधळ आणि दिल्लीत मुजरा अशी स्थिती झाली आहे. काही दिवसांपूर्वी म्हणजेच कोविडच्या तिसऱ्या लाटेची चर्चा होण्यापूर्वी राज्यात नाशिकचे लसीकरण अव्वल असल्याच्या बातम्या आल्या. प्रशासनानेच ही माहिती पुरवली. त्यामुळे सगळ्यांकडून कौतुकाचा वर्षाव झाला. मात्र, आता त्यातूनच एकेक सुरस कथा उदयाला येत आहेत. त्यात चक्क ज्यांचे दोन डोसे घेणे झाले आहे, त्यांचीच नावे लस न घेतलेल्यांच्या यादीत आली आहेत. त्यामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
कसे फुटले बिंग?
राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 10 जानेवारीपासून बूस्टर देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. नाशिकमध्येही आरोग्य कर्मचारी आणि ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोस देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 62 हजार 352 आरोग्य कर्मचारी आहेत. मात्र जिल्ह्यातील जवळपास 22 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांनी दुसरा डोस घेतलेला नाही, असे उघड झाले होते. त्यामुळे अनेकांनी चिंता व्यक्त केली होती. पण त्याचे झाले असे आहे की, यातील अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतले आहेत. ते बूस्टर डोससाठी जेव्हा केंद्रावर जातात, तेव्हा त्यांचे नाव डोस न घेतलेल्यांच्या यादीत दिसत आहे. त्यामुळे या कर्मचाऱ्यांमध्ये संताप आहे.
नोंदणीत चूक
कोरोना लसीकरण केल्यानंतर संबंधित केंद्रावर नोंदणी केले जाते. मात्र, या नोंदणीत घोळ होत असल्याचे समोर आले आहे. अनेकांच्या नावाची चुकीची नोंद करण्यात आली आहे. अनेकांचे मोबाईल क्रमांक चुकले आहेत. तर अनेकांची नावे आणि पत्ते चुकले आहेत. काही ठिकाणी आधी हाताने रजिस्टरवर नोंद केली जाते. त्यानंतर अॅपवर ही नावे व नोंद टाकली जाते. यातच चुका होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे बूस्टर डोस घेण्यासाठी गेलेले अनेक आरोग्य कर्मचारी संताप व्यक्त करत आहेत.
लसीकरणाचे आवाहन
नाशिकचे विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोडे यांना पहिला बूस्टर डोस घेतला आहे. जिल्ह्यातील इतर हेल्थ वर्कर्सना प्रिकॉशन डोस देण्यात येणार आहेत. त्यासाठी त्यांना कोणत्याही प्रकारचे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. फक्त दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमध्ये नऊ महिन्यांचे अंतर बंधनकारक आहे. 10 एप्रिल 2021 पू्र्वी डोस घेतलेले असे 45 हजार हेल्थ वर्कर्स या मोहिमेसाठी पात्र असणार आहेत. त्यांनी तातडीने लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. मात्र, लसीकरणाच्या या घोळामुळे कर्मचाऱ्यांची गोची होत आहे.
Nashik | नाशिक बाजार समितीत 500 कोटींचा घोटाळा; भाजपची ‘ईडी’कडे तक्रार, प्रकरण काय?
Nashik | 127 किमी वेगाने दुचाकी झाडावर आदळली; 2 मित्र 30 फूट खोल खड्ड्यात पडून गतप्राण
Nashik | थाप मारून थापाड्या गेला, मंत्रालयात ओळख असल्याचे सांगत नणंद-भावजयीला 43 लाखांना फसवले