नाशिकः महापालिका (Municipal Corporation) निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज नाशिकमध्ये (Nashik) आहेत. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे उद्घाटन करून भाजप (BJP) महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारांची चाचपणी सुरू केलीय. तर काँग्रेस प्रभारी ब्रिजकिशोर दत्तही नाशिक दौऱ्यावर आहेत. येणाऱ्या काळात कधीही निवडणुका लागू शकतात. त्यामुळे सदानकदा थंड असणाऱ्या नाशिकचा राजकीय पारा वाढताना दिसतोय. आज देवेंद्र फडणवीस पाच वर्षांपूर्वीच्या बहुचर्चित आणि गेमचेंजर ठरलेल्या अशा नाशिक दत्तक घोषणेनंतर काय बोलणार, याची उत्सुकता लागलीय. कारण त्यांनी केलेल्या या घोषणेनंतरच नाशिककरांनी महापालिकेत भाजपला बहुमत दिले होते.
नेमकी घोषणा काय?
तत्कालीन मुख्यमंत्री आणि सध्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची 18 फेब्रुवारी 2017 रोजी नाशिकमधल्या हुतात्म अनंत कान्हेरे मैदानावर प्रचार सभा झाली होती. यावेळी त्यांनी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली होती. ते म्हणाले होते, ‘नाशिकला कोणी वाली नाही किंवा नेता नाही, अशी खंत नाशिककरांना वाटते. त्यामुळे माझ्यावर विश्वास ठेवा, मी नाशिक दत्तक घेतो’, अशी घोषणा केली. त्यानंतर पुढे भाजपने जाहीरनामा प्रसिद्ध केला. त्यात 600 खाटांचे रुग्णालय, मेट्रो आणि मोनोरेल चाचणी, बहुमजली पार्किंग, पर्यावरणपूरक बससेवा, ई-रिक्षा, तपोवन पर्यटन विकास, क्रीडा प्रबोधनी, आयटी हब, रोजगार निर्मिती, शहरात सीसीटीव्ही, महापालिका रुग्णालयात जन्मास येणाऱ्या मुलींसाठी बेटी बचाव अंतर्गत 5 हजार रुपये, असे आश्वासने दिली होती. यातली बहुतांस आश्वासने म्हणावी तितकी तडीस गेली नाहीत, हे विशेष.
आज काय उद्घाटन?
नाशिकमध्ये 17 एकरवर उभारलेल्या वसंतराव कानेटकर उद्यानाच्या नूतनीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. तर 5 एकरावर उभारलेल्या स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर रुग्णालयाचे काम पूर्ण झाले आहे. या दोन्ही प्रकल्पाचे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. सोबतच विविध प्रभागातील जलवाहिन्या, रस्ते, ड्रेनेज लाइन, राजमाता जिजाऊ महिला योगा हॉल अशा कामांचे लोकार्पण होणार आहे. यावेळी महापौर सतीश कुलकर्णी, माजी मंत्री गिरीश महाजन, जयकुमार रावल, भाजप शहराध्यक्ष गिरीश पालवे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, महापालिका आयुक्त कैलास जाधव, आमदार देवयानी फरांदे, सीमा हिरे, राहुल ढिकले उपस्थित राहणार आहेत.
आज कोणती खेळी?
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केली. त्यानंतर त्यांना शहरवासीयांनी महापालिकेत पूर्ण बहुमत दिले. मात्र, आता परिस्थिती तशी राहिलेली नाही. नाशिक दत्त घोषणाच काय जाहीरनाम्यातील अनेक आश्वासनेही तशीच आहेत. पक्षांतर्गत असंतोष धुसफुसतोय. याचा प्रत्यय अनेकदा महापालिकेच्या सभेत आलाय. शिवसेना दिवसेंदिवस कडवे आव्हान उभे करतेय. महाविकास आघाडीत सध्या फाटाफूट असली तरी निवडणुकीनंतर हे पक्ष सत्तास्थापनेसाठी एकत्र येऊ शकतात. नगरपंचायत निवडणुकीतही तसेच पाहायला मिळाले. या साऱ्या पार्श्वभूमीवर भाजप आणि विशेषतः देवेंद्र फडणवीस काय खेळी खेळणार, याकडे लक्ष लागले आहे.
पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला
‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात
शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात