नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये (Nashik) भाजपने (BJP) प्रभारी पदाची जबाबदारी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर सोपवली. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपला पुन्हा सत्तेत आणण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे. शिवसेनेकडून स्वतः संजय राऊत यांनी नाशिक महापालिकेत लक्ष घातले आहे. काही दिवसांपूर्वी आदित्य ठाकरे यांच्यासह मंत्र्यांचा लवाजवा नाशिकमध्ये येऊन गेला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडूनही नाशिकसाठी जोर लावण्यात येतोय. राज ठाकरे सप्टेंबरपासून नाशिक दौरे करतायत. काही दिवसांपू्र्वी अमित ठाकरेही नाशिक दौऱ्यावर होते. भुजबळांनीही एकला चलो रे म्हणत राष्ट्रवादीकडून जोरदार तयारी सुरू केलीय. महापालिका निवडणुकीतील हे विरोधकांचे तगडे आव्हान आणि पक्षातील नाराजांचा गट महाजन कसा सांभाळणार का, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
पक्षात कोणाचे आव्हान?
भाजपमध्ये आमदार देवयानी फरांदे आणि गिरीश महाजन यांच्यातील सख्य साऱ्यांनाच माहिती आहे. स्थायी सदस्यांच्या निवडीत महाजनांनी फरांदे यांच्या शिलेदारांना मिठाच्या खड्यासारखे बाजूला सारले. त्यानंतर या दोघांमधील शीतयुद्ध लपून राहिले नाही. आता इतक्या दिवस महाजनांच्या जागी प्रभारी जयकुमार रावल होते. महाजन पुन्हा नाशिकमध्ये येणार नाहीत, हे गृहीत धरून त्यांच्या मर्जीतील अनेक नगरसेवकांनी विरोधकांशी संधान साधले, तर अनेकांनी सोयीचा मार्ग पत्करला. आता महाजन आल्यानंतर निवडणुकीच्या तोंडावर किती नगरसेवक थांबणार आणि किती नगरसेवक दुसऱ्या पक्षात जाणार हे पाहावे लागेल.
तगडी फळी समोर
भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गिते, नगरसेविका हेमलता कांडेकर, डॉ. सीमा ताजणे तसेच भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष मनीष बागुल यांनी नुकतेच शिवबंधन बांधले. उपमहापौर भीकुबाई बागुल भाजपमध्ये असल्या, तरी त्यांचे पुत्र सुनील बागुल आणि नातू मनीष बागुल आता शिवसेनेत आहेत. सुनील बागुल यांच्याकडे उपनेतेपदाची जबादारी देण्यात आलीय. सोबतच संपर्क नेते संजय राऊत, संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांचे तगडे आव्हान महाजनांसमोर असेल.
पक्षांतराची चर्चा
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे उजवे आणि डावे हात अशी गिरीश महाजन – जयकुमार रावल यांची ओळख. मात्र, अचानक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर रावल यांना प्रभारी पदावरून हटवून सहप्रभारी केले. महाजनांना प्रभारी केले. यामागचे नेमके कारण म्हणजे भाजपमधील जवळपास पंधरा नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. जर यात नाराजांचा समावेश असेल, तर त्यांना थांबवण्याचे मोठे आव्हान महाजनांसमोर आहे. स्वपक्षातील विरोधक, नाराज यांच्यासोबत शिवसेनेची फळी, राष्ट्रवादीचे आव्हान आणि मनसेची खेळी महाजन परतावून लावणार का, भाजप पुन्हा सत्तेत येणार का, हे काळच सांगेल.
त्रिसदस्यीय पद्धतीने प्रभाग
– आता 133 नगरसेवक
– एकूण प्रभाग 44
– 43 प्रभाग 3 सदस्यीय
– 1 प्रभाग 4 सदस्यीय
पक्षीय बलाबल
– भाजप – 66 (एका नगरसेवकाचे निधन. सध्या 64)
– शिवसेना – 35 (सध्या 33)
– राष्ट्रवादी – 6
– काँग्रेस – 6
– मनसे – 5
– अपक्ष – 4
चर्चा तर होणारच: केंद्रीय मंत्री भागवत कराडांच्या दौऱ्याचे नाशिकमध्ये ‘कुर्रर्रर’ राजकीय नाट्य…!
कापडणीस पिता-पुत्राचा 4 जणांनी केला मर्डर; नाशिकमधील शेअर्स कंपनीच्या मॅनेजरचा सहभाग