नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या येवला वन विभागाने (Forest Department) आज बदलापूर येथे पुन्हा एक बिबट्या (leopard) जेरबंद केला आहे. गेल्या 21 दिवसांत पकडलेला हा दुसरा बिबट्या असून, त्यामुळे नागरिकांची भीतीने गाळण उडाली आहे. सध्या या भागात बिबटे जनावरांवर हल्ला करत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. येवला तालुक्यातील बदापूर शिवारात बिबट्याचा मुक्त संचार सुरू आहे. शेतकऱ्यांनी येवला वनविभागाकडे बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली होती. वनविभागाने नानासाहेब मोरे यांच्या शेतात पिंजरा लावला. मात्र, या पिंजऱ्याच्या ठिकाणीही बिबट्याने हुलकावणी देत मोकाट जनावरांवर हल्ला करून शिकाल केली होती. अखेर हा बिबट्या आता जाळ्यात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
निफाड रोपवाटिकेत रवानगी
येवला तालुक्यात गेल्या एकवीस दिवसांत जेरबंद झालेला हा दुसरा बिबट्या आहे. हा बिबट्या मादी जातीचा असून, अंदाजे दीड ते दोन वर्षाचा असल्याची माहिती वन विभागाने दिली आहे. या बिबट्याची निफाड येथील रोपवाटिकेत रवानगी केली असून, तेथे पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून तपासणी केल्यानंतर बिबट्याला पुन्हा अधिवासात सोडून देण्यात येणार आहे. या अगोदर आठ जानेवारी रोजी नर जातीचा अंदाजे दीड ते दोन वर्षाचा बिबटया जेरबंद झाला होता. दोन्ही बिबटे जेरबंद झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण असून, यामुळे आता भीती ही कमी होणार आहे.
इगतपुरी तालुक्यातही वावर
येवला सोबतच इगतपुरी तालुक्यातील बेलगाव कुऱ्हे पंचक्रोशीत बिबट्याचा नेहमी वावर असतो. बिबटे अनेक गायी, म्हशी, वासरे, श्वान आदी पाळीव प्राण्यांचा फडशा पाडून शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी रानात जाणाऱ्या नागरिकांवर हल्ले केले. काही दिवसांपूर्वी घराच्या अंगणातून एका लहान मुलाला उचलून नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुलाच्या आईने दाखविलेल्या धैर्याने बिबट्याला काढता पाय घ्यावा लागला. या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
हिंस्त्र प्राणी गाव आणि शहराकडे
बिबट्यासारखा हिंस्त्र प्राणी वारंवार गाव आणि शहराकडे धाव घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. मानवाने प्राण्यांचा अधिवास बळकावला. जंगलांची अक्षरशः कत्तल केली. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्जन्य चक्रात प्रचंड बदल झाले आहेत. एकाचवेळी अतिवृष्टी आणि एकाचवेळी दुष्काळाचा अनुभव आपण घेत आहोत. निसर्गाला ओरबाडने मानवाने थांबवले नाही, तर यापेक्षा भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञ देत आहेत.
Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?
Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?