नाशिकः नाशिक (Nashik) जिल्ह्यात बिबट्याच्या (leopard) वावरामुळे नागरिक त्रस्त आहेत. कधी गावात जाऊन बिबट्या अंगणातले बाळ उचलून धावू लागतो, तर कधी पारासमोर उभ्या असलेल्या माणसांवर हल्ला करतो. अशा अनेक बातम्या गेल्या वर्षभरापासून आपण वाचल्या. मात्र, आता रस्त्यावर जखमी होऊन बेशुद्ध (Unconscious) पडलेल्या बिबट्याने जेव्हा नागरिकांच्या अंगावर डरकाळी फोडून झेप घेतली, तेव्हा पादचाऱ्यांची भीतीने गाळण उडाली. अन् वाहनधारकांचाही क्षणभर ठोका चुकला. ही सारी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. हे पाहून कोणाच्या काळजाचे पाणीपाणी होईल, यात शंकाच नाही. येणाऱ्या काळात वन्यजीव प्राणी आणि मानवातील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत.
नेमकी घटना काय?
नाशिकमधील त्र्यंबक रोड परिसरात एक बिबट्या जखमी होऊन बेशुद्ध पडला होता. रस्त्याच्या मधोमध पडलेला हा बिबट्या. त्यामुळे अनेक वाहनधारक वेगात यायचे आणि जवळ येताच घाबरायचे. पादचारीही बिबट्या पडलाय. वाहने कडेने न्या, असे आवाहन करत होते. रात्र झाल्याने अंधार पडलेला. त्यात रस्त्यावरल्या लाइट बंद. त्यामुळे सगळीकडे काळोख. फक्त वाहन आले, तरच दिसायचे. काही वेळ गेला. अचानक पाच-सहा वाहने वेगात आली. त्यात काही दुचाकीधारकही होते. तितक्यात इतक्या वेळ बेशुद्ध पडलेला बिबट्या उठला. त्याने डरकाळी फोडली आणि अचानक झेप घेतली.
नुसता गोंधळ सुरू
इतक्यावेळ रस्त्यावर बिबट्या शांत पडून होता. तो बेशुद्ध होता. त्यामुळे अनेकजण गाड्या उभ्या करून त्याला पाहत होते. कोणी पादचारी जवळ जात निरीक्षण करत होते. मात्र, बिबट्या अचानक शुद्धीवर आला. त्याने डरकाळी फोडली. रोडवरून येणारी वाहने आणि नागरिकांकडे अचानक झेप घेतली. त्यावेळी एकच गोंधळ उडाला. अनेकांनी आरडाओरडा केला. मात्र, बिबट्या जोरजोरात गुर्रकत निघून गेला. या काही क्षणांच्या खेळाने अनेकांच्या पाचावर धारण बसली.
भीतीचे वातावरण
नाशिक जिल्ह्यातील येवला, इगतपुरीसह अनेक तालुक्यात बिबट्याचा नेहमी वावर असतो. बिबटे अनेक गायी, म्हशी, वासरे, श्वान आदी पाळीव प्राण्यांचा फडशा पाडून शेतकऱ्यांच्या नाकी नऊ आणत आहेत. अनेक ठिकाणी त्यांनी रानात जाणाऱ्या नागरिकांवर हल्ले केले आहेत. काही दिवसांपूर्वी घराच्या अंगणातून एका लहान मुलाला उचलून नेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुलाच्या आईने दाखविलेल्या धैर्याने बिबट्याला काढता पाय घ्यावा लागला. या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
संतुलन बिघडले
बिबट्यासारखा हिंस्त्र प्राणी वारंवार गाव आणि शहराकडे धाव घेण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढले आहे. मानवाने प्राण्यांचा अधिवास बळकावला. जंगलांची अक्षरशः कत्तल केली. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. पर्जन्य चक्रात प्रचंड बदल झाले आहेत. एकाचवेळी अतिवृष्टी आणि एकाचवेळी दुष्काळाचा अनुभव आपण घेत आहोत. निसर्गाला ओरबाडने मानवाने थांबवले नाही, तर यापेक्षा भयंकर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा इशारा पर्यावरण तज्ज्ञ देत आहेत.
नाशिकमध्ये रस्त्यावर बेशुद्ध पडलेल्या बिबट्याने नागरिकांवर झेप घेतली आणि….! pic.twitter.com/3nCJQxRKZG
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 3, 2022
इतर बातम्याः
कोट्यवधींची उड्डाणे घेणाऱ्या साहित्य संमेलनाचा हिशेब द्या; नाशिकमध्ये निमंत्रकांना घरचा आहेर
Nashik | गाडगेबाबांच्या धर्मशाळेत 85 वर्षांपासून अविरत अन्नछत्र; वंचिताचा अनोखा आधारवड!