नाशिक : राज्यात धमकीचे सत्र सुरूच आहे. काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोनवरुन धमकी दिल्याचे समोर आले होते. यामध्ये काहींना कॉल वर तर काहींना मेसेज करून ही धमकी देण्यात आली आहे. धमकीनंतर खरंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर अनेक नेत्यांची सुरक्षा वाढवण्यात आली होती. या घटना ताज्या असतांनाच नाशिकमध्ये शिवीगाळ करत धमकी दिल्याची घटना समोर आली आहे. कॉंग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांना धमकी देण्यात आली आहे. हिरामण खोसकर हे इगतपुरी – त्र्यंबकेश्वर मतदार संघाचे आमदार आहे. त्यांच्या तक्रारीवरुन पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सध्या राज्यातील बाजार समितीच्या निवडणुक प्रक्रिया सुरू आहे. एकीकडे उन्हाचा पारा वाढत असल्याने राजकीय वातावरण देखील चांगलेच तापले आहे. त्याच दरम्यान हा धमकीचा प्रकार घडला आहे. यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
नाशिक बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये माघारी नंतर आता प्रचाराचा नारळ फोडला जात असून प्रचार सुरू झाला आहे. वेगवेगळ्या माध्यमातून प्रचार केला जात आहे. त्याच दरम्यान विरोधात प्रचार करत आहे म्हणून आमदार हिरामण खोसकर यांना धमकीचा फोन आला आहे.
नाशिक बाजार समितीत दोन प्रमुख पॅनल आहे. माजी खासदार तथा माजी सभापती देविदास पिंगळे यांचा एक पॅनल असून माजी सभापती शिवाजी चुंभळे यांचा एक पॅनल आहे. दोन्ही पॅनल मध्ये खरी लढत असून सुरुवातीपासूनच ही निवडणूक चुरशीची मानली जात आहे.
त्याच दरम्यान हिरामण खोसकर यांनी देविदास पिंगळे यांच्या बाजूने प्रचार सुरू केला आहे. महाविकास आघाडी म्हणून देविदास पिंगळे यांनी पॅनल तयार केला आहे. त्याचाच राग मनात धरून शिवाजी चुंभळे आणि त्यांचे पुत्र अजिंक्य चुंभळे यांनी धमकी दिल्याचा आरोप आमदार खोसकर यांनी केला आहे.
याबाबत खोसकर यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीवरुन अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला असून शिवाजी चुंभळे हे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या पॅनलकडून निवडणुकीला समोर जात आहे. या धमकीच्या प्रकारानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
दरम्यान आगामी काळात हे धमकीचे प्रकरण कुठवर जातं हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे याबाबत पोलिस काय कारवाई करतात याकडे राजकीय नेत्यांचे लक्ष लागून आहे.