नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तहसिल कार्यालयाच्या आवारात बेवारस गाय प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे तडफडत असल्याचे लक्षात येताच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. डाॅक्टरांनी गाईच्या वेदना समजून घेतल्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेऊन तात्काळ शस्त्रक्रिया केली असता गाईच्या पोटातून तब्बल 30 किलोहुन अधिक प्लास्टिक बाहेर काढले आणि गाईचा जीव वाचवला म्हणतातना देव तारी त्याला कोण मारी पशुवैद्यकीय अधिकारी गाईसाठी देवासारखे धावून आलेत. हा प्रत्यक्ष अनुभव उपस्थितांनी यांची देही याची डोळा बघितला.
सटाणा तहसिल कार्यालयाच्या आवारात एक बेवारस गाय रखरखत्या उन्हात प्रकृती अस्वस्थ झाल्यामुळे तडफडत होती तिच्या वेदना तहसील कार्यालयाच्या आवारातील काही नागरीकांच्या नजरेस पडल्या. त्यांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन प्रकाश रूद्रवंशी यांच्याशी संपर्क साधून गाईला होत असलेल्या वेदनांची माहिती दिली.
डाॅ. देवासारखे गाईसाठी धावत आले. त्यांनी तिच्या शरीराच्या हालचाली लक्षात घेऊन पोटातील पचन संस्थेमध्ये अडथळे निर्माण झाले असतील असा निष्कर्ष बांधला आणि तात्काळ शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी मदतीला घेऊन डॉ.रूद्रवंशी यांनी गाईची शस्त्रक्रिया केली.
गाईच्या पोटातून प्लास्टिकच्या पिशव्या दो-या आदी 20 किलो पेक्षा अधिक वस्तू बाहेर काढल्यात आणि गाईची पचन संस्था पुर्व पदावर आणुन बेवारस गाईचा जीव वाचवला. गाईच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांच्या लक्षात येताच तिला सुरक्षित जागेवर हलवून तिची काळजी घेतली जाईल अशा ठिकाणी स्थलांतरित करण्याचा निर्णय घेऊन गाईला दोधेश्वर येथील गोशाळेत रवाणा केले आहे.
जणावरांचे पोट चार कप्प्यात असते चारा खाऊन जणावरांचे स्वास्थ्य चांगले राहते. प्लॅस्टिक सदृश वस्तू जणावरे पचवू शकत नाही त्यासाठी नागरीकांनी काळजी घ्यायला हवी असे आवाहन पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चंदन प्रकाश रूद्रवंशी यांनी केले आहे. नागरिकांनी कचरा टाकतांना जनावरांच्या खाण्यात येणार नाही याची काळजी घ्यायला हवी.
शहरात मोकाट फिरणाऱ्या जणावरांना घरातील शिल्लक असलेले अन्न प्लास्टिकच्या पिशवीत टाकून घराबाहेर ठेवू नये त्याला मोकाट जणावरे बळी पडतात. त्यामुळेच त्यांचे स्वास्थ्य बिघडते. याची काळजी नागरीकांनी घ्यायला हवी असे मत उपस्थित असलेले शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी व्यक्त केले आहे.
अनेकदा शहरात मोकाट फिरणारे जनावरे यांच्या पोटात प्लॅस्टिक सदृश्य वस्तु गेल्याने त्यांच्या पोटात मोठा बिगाड होत असतो. त्यांच्यावर अनेकदा उपचार करण्यासाठी पुढे कुणी येत नाही. मात्र, नाशिकच्या सटाणा येथील शासकीय अधिकाऱ्यांसह डॉ. चंदन प्रकाश रूद्रवंशी हे धावून आल्यानं सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.