नाशिकः राज्यभराचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक (Nashik) महापालिकेची (municipal corporation) निवडणूक (election) ठरलेल्या वेळेत होत नसल्याने अखेर नगरविकास विभागाने प्रशासकाची नियुक्ती केलीय. त्यानुसार आज 14 मार्चपासून प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त कैलास जाधव हे कामकाज पाहणार आहेत. विद्यमान महापौर आणि उपमहापौरांची मुदत उद्या 15 मार्चला संपतेय. त्यापूर्वीच आज आयुक्तांकडे महापालिकेचा कारभार येणारय. महापौर आणि उपमहापौरांनी महापालिकेची वाहन जमा केलीयत. महापौरांचे शासकीय निवासस्थानही आता प्रशासकांच्या अखत्यारित येणार आहे. दुसरीकडे जिल्हा परिषदेतील कारभाऱ्यांचा कार्यकाळ 20 मार्च रोजी संपत आहे. येथेही प्रशासकीय राजवट लागू होणार असून, येथील प्रशासकीय सूत्रे मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांच्या हाती जाणार आहेत. प्रशासकीय राजवटीत महापालिकेत आयुक्त आणि जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे महत्त्व वाढणार असल्याने अप्रत्यक्षपणे सत्तेची चावी महाविकास आघाडी सरकारडेच जाणार आहे.
प्रभाग रचना नव्याने होणार
महापालिकेच्या 133 जागांसाठी 3 सदस्यीय पद्धतीने 44 प्रभागांच्या कच्च्या रचनेचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यावर सुनावणीही झाली होती. नगरसेवकांची संख्या 122 वरून 133 वर नेल्याने एका प्रभागाची लोकसंख्या साधारणतः 33 हजारांच्या घरात ठेवण्यात आली होती. मात्र, प्रभाग रचना वादाच्या भोवऱ्यात सापडली. अनेकांनी मातब्बर लोकांनी आपल्याला हवी तशी प्रभाग रचना करून घेतल्याचे आरोप झाले. याला अडथळे ठरणाऱ्या स्वकीयांचे पत्ते कट करून त्यांचा करेक्ट कार्यक्रम केल्याचे बोलले गेले. मात्र, ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे राज्य सरकारने निवडणूक विभागाचे सारे अधिकार स्वतःकडे घेतले. आता पुन्हा नव्याने प्रभाग रचना होऊन निवडणुका होण्याची शक्यता आहे. सध्या सरकारने तीन महिने तरी निवडणुका पुढे ढकलल्याचे म्हटले आहे. मात्र, या निवडणुका दीपावलीपर्यंत लांबू शकतील, अशी शक्यता आहे.
झेडपीतही तेच
नाशिक जिल्हा परिषदेचेही प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम सुरू होते. मात्र, ओबीसी आरक्षणामुळे या निवडणुकाही लांबण्याची शक्यता आहे. नाशिक शहरी भागासाठी 2 महापालिका, 8 नगरपालिका, 7 नगरपंचायती आहेत. मात्र, ग्रामीण भागाचा गावगाडा एकट्या जिल्हा परिषदेवर सुरू असतो. ग्रामीण भागात 2011 मधील जनगणनेनुसार 34 लाख 99 हजार 792 लोकसंख्या होती. त्यात साधरणतः पाच टक्के वाढ झाल्याचा अंदाज आहे. त्यामुळे आरोग्य, शिक्षण, मुलभूत सुविधा विकास कामे साऱ्यांची जबाबदारी ही वाढली. हे पाहता जिल्हा परिषदेतील सदस्य संख्या वाढवण्यात आली आहे. नव्या प्रभागरचनेनुसार यंदा जिल्ह्यात 73 गटांमध्ये 11 गटांची वाढ झाली आहे. त्यामुळे सध्या एकूण 84 गट आहेत. तर प्रत्येक गटात 2 गणांची वाढ झाली आहे. त्यामुळे 146 वरून गणांची संख्या आता 168 झाली आहे.
महापालिकेची अशी होणार निवडणूक…
– त्रिसदस्यीय पद्धतीने प्रभाग
– आता 133 नगरसेवक
– एकूण प्रभाग 44
– 43 प्रभाग 3 सदस्यीय
– 1 प्रभाग 4 सदस्यीय
महापालिकेतील पक्षीय बलाबल
– भाजप – 66 (एका नगरसेवकाचे निधन. सध्या 64)
– शिवसेना – 35 (सध्या 33)
– राष्ट्रवादी – 6
– काँग्रेस – 6
– मनसे – 5
– अपक्ष – 4
Nashik | महापालिकेच्या कोषागार विभागात घोटाळा, नियमित भरण्यावरच डल्ला, नेमके प्रकरण काय?