लासलगावः नाशिक (Nashik) जिल्ह्यातल्या पिंपळगाव बसवंत येथे एका मद्यधुंद (Drunk) तरुणाने जळत्या चितेवर उडी मारल्याची घटना घडलीय. या तरुणाला मृताच्या नातेवाईकांनी वाचवले. मात्र, अचानक घडलेल्या या प्रकाराने चांगलीच खळबळ उडाली. या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत येथील अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी (funeral) काही जण आले होते. त्यांनी विधी उरकल्यानंतर घराची वाट धरली. मात्र, तितक्यात एका तरुणाने चितेवर उडी मारली. हे पाहताच अमरधाममध्ये काम करणारे पंकज इरावत यांनी आरडाओरडा केला. घराकडे निघालेल्या नातेवाईकांनी चितेकडे धाव घेत त्या तरुणाला बाहेर काढले. त्याच्या अंगावर आगीमुळे अनेक ठिकाणी चटके बसल्याचे समोर आले आहे. असे कृत्य करणाऱ्या तरुणाला धड बोलताही येत नव्हते. तो पूर्णतः दारूच्या नशेत होता. त्याला धरल्यानंतरही तो चितेकडे ओढ घेत होता.
चितेवर उडी मारण्याने तरुणाने यापूर्वी कादवा नदीच्या पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीही त्याला वाचवण्यात आले होते. चितेवर उडी मारल्यानंतरही तरुणाला मृतांच्या नातेवाईकांनी बाहेर काढले. त्याच्या अंगाला अनेक ठिकाणी पोळले. मात्र, त्यानंतरही त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला. शेवटी सगळ्यांनी मिळून त्याला दोरीने बांधले. त्यानंतर हा तरुण शांत झाला. तरीही अनेकवेळ त्याचा आरडाओरडा सुरू होता. या प्रकाराने सारेच गोंधळून गेले होते.
नाशिकमध्ये यावर्षी ज्येष्ठ कवी आणि, गीतकार विनायक पाठारे यांच्या अंत्यसंस्कारात दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याचा प्रकार घडला होता. सरणाची लाकडे काढून ही हाणामारी झाली. त्यानंतर जिल्ह्यात चक्क चितेवर उडी घेण्याचा हा प्रकार घडला आहे. यामुळे शेवटच्या क्षणी तरी मृतांना शांतपणे जाऊ द्या, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. शिवाय दारू पिऊन मोकाट फिरणाऱ्या या तरुणावर घरातल्या मंडळींनी लक्ष द्यावे. अन्यथा असा प्रकार जीवावर बेतू शकतो, अशा प्रतिक्रियाही यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.