नाशिक : आज नाशिकमध्ये लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकासह पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण पार पडत आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंकजा मुंडे, छगन भुजबळ यांच्यासह राज्यातील डझनभर नेते उपस्थित आहे. या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी बोलताना गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या वेळेला छगन भुजबळ यांनी एक भावनिक किस्सा देखील सांगितला आहे. याशिवाय गोपीनाथराव मुंडे हयात असते तर मी जेलमध्ये गेलो नसतो असं मोठं वक्तव्य देखील छगन भुजबळ यांनी जाहीर व्यासपीठावर केले आहे. इतकंच काय गोपीनाथ मुंडे यांनीच भाजप हा पक्ष बहुजन नेत्यांमध्ये नेण्याचे काम केले होते असं म्हंटलं आहे.
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील नांदूर शिंगोटे या गावात गोपीनाथ मुंडे यांचे स्मारक आणि पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. त्या कार्यक्रमात छगन भुजबळ यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या सोबतच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. त्या सांगत असतांना छगन भुजबळ काहीसे भावुक झाले होते.
छगन भुजबळ म्हणाले, महाराष्ट्रातील उत्कृष्ट स्मारक उभं राहिलं आहे, एवढे लोक कुणासाठी उगाच येत नाहीत. माझ्या मोठा भावाचा सप्तशृंगी गडावर अचानक मृत्यू झाला होता. त्यानंतर माझा लहान भाऊ गोपीनाथ मुंडे यांच्या मृत्यू नंतर मला सर्वात जास्त दुःख झालं होतं.
गोपीनाथ मुंडे यांनी मला ओबीसी चळवळीत नेहमी मोठा भाऊ म्हणून मानलं आहे. भारतीय जनता पार्टी बहुजनांमध्ये सर्वात जास्त प्रचार आणि प्रसार गोपीनाथ मुंडे यांनी केला आहे. ओबीसींची जातीय जनगणना करण्याचा आग्रह गोपीनाथ मुंडे यांनी धरला होता असेही छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे.
याशिवाय गोपीनाथराव असते तर माझे अडीच वर्षे जेल मध्ये कधीच गेले नसते असे छगन भुजबळ म्हणाले आहे. हा माझा भाऊ माझ्या पाठीशी उभा राहिला असता असे आणि जनगणना तर त्यांनी केलीच असती असंही भुजबळ म्हणाले आहे. खरंतर छगन भुजबळ यांना ईडीने अटक केली होती.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळ यांना ईडीकडून अटक करण्यात आली होती. त्यामध्ये आर्थररोड येथील कारागृहात जवळपास अडीच वर्षे छगन भुजबळ हे कारागृहात होते. तीच बाब टळली असती असे एक प्रकारे भुजबळ यांनी म्हंटलं आहे.
पुढे भुजबळ म्हणाले, राजकारणात उलथा पालथं होत असतात. पण लोकांच्या मनात जे लोक असतात त्यांना कोणीही मनातून काढू शकत नाही, याच दरम्यान पंकजा मुंडे यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देखील उपस्थित कार्यकर्त्यांनी दिल्या होत्या.
गोपीनाथ मुंडे यांनी हाती घेतलेले काम शेवटचा श्वास असे पर्यंत सोडणार नाही ही प्रतिज्ञा करतो असेही छगन भुजबळ यांनी म्हणत गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणी सांगत भुजबळ यांनी अभिवादन केले आहे.