नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला त्यावरून महाराष्ट्रासह संपूर्ण देशांमध्ये राजकीय चर्चेला उधाण आलं होतं. याच दरम्यान राजीनामा मागे घेत असताना शरद पवार यांनी अजित पवार यांना मी राजीनामा देत असल्याची कल्पना होती असं पत्रकार परिषदेत म्हटलं होतं आणि त्यानंतरच संपूर्ण राज्यामध्ये शरद पवारांच्या राजीनाम्याचा ज्यांना धक्का बसला होता त्यांच्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. यावरच छगन भुजबळ यांनी मोठं वक्तव्य केले आहे. याशिवाय उद्धव ठाकरे यांच्या बारसू रिफायनरीच्या संदर्भात ग्रामस्थांच्या भेटी प्रसंगी छगन भुजबळ यांनी भाष्य केले आहे.
शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला त्या राजीनामाच्या घडामोडीमध्ये मी नव्हतो असे सांगत असतांना छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्या राजीनाम्याची कल्पना अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना होती असं छगन भुजबळ यांनी म्हंटले आहे. अर्धा कार्यक्रम सोडून मी कोर्टात गेलो, तिथे मला कळाले की शरद पवार यांनी राजीनामा दिला त्यावेळी मला धक्का बसला होता.
अध्यक्ष निवड समिती गठीत केली, पण मी आधीच सांगितले होते की कमिटी आम्हाला मान्य नाही, त्यामुळे माझी भूमिका मी तेव्हाही स्पष्ट केली होती. मात्र, शरद पवार यांच्या राजीनाम्याची कल्पना कुटुंबातील नेत्यांना माहिती होती असं मत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी मांडले असून त्यानंतर उलट सुलट चर्चा होण्याची शक्यता आहे.
याशिवाय छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे यांच्या आजच्या बारसू रिफायनरीच्या संदर्भातील भूमिकेवरुन भाष्य केले आहे. उद्योग येत नाही अशी ओरड वारंवार होते, त्यामुळे जायला पाहिजे, लोकांची भावना समजून घेतली पाहिजे, उद्योग आले पाहिजे, पण त्याचा पर्यावरणाला किती धोका आहे हे तपासले पाहिजे असेही मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
प्रकल्प जबरदस्तीने लादण्याची गरज नाही, समर्थन आणि विरोधात आंदोलन करू नये. एकमेकांना भिडण्याची आवश्यकता नाही. उद्धव ठाकरे जात आहेत त्यांना माहिती मिळाली पाहिजे, त्यानंतर ते त्यांचे मत व्यक्त करतील अशी प्रतिक्रिया छगन भुजबळ यांनी व्यक्त करत उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर स्पष्ट भूमिका मांडली आहे.
तर दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा रद्द झाल्या नसल्याचे छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये उष्णतामुळे वज्र्यमूठ सभा तहकूब केल्या आहेत रद्द केले नाही. सातत्याने सभा घ्यायचा का हा विचार ही पुढे आला त्यामुळे निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे.