नाशिक : गेल्या दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्री आमदार आणि इतर पदाधिकारी हे आयोध्येत प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी गेले होते. तो दौरा पूर्ण करून महाराष्ट्रात परत येत असतानाच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांवर संकट कोसळत होते. रविवारी सायंकाळ पासून उत्तर महाराष्ट्रासह राज्यातील बहुतांश ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरशा शेतकऱ्यांचं होत्याचं नव्हतं केलं होतं. हाता तोंडाशी आलेला घास हिरावून गेल्याची स्थिती बळीराजाची झाली होती. यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कांदा, द्राक्ष, डाळिंब, आणि गहू यांसह विविध पिकांचं नुकसान झाले आहे. त्यामुळे तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जात असतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सटाण्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहेत. डाळिंब, कांदा, द्राक्ष आणि गहू यासारख्या पिकांची पाहणी करत शेतकऱ्यांशी संवाद साधत आहेत.
अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीच्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या भागात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली आहे. त्या भागातील शेतीचे तात्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे सुपूर्द करावा अशा सूचना दिल्या होत्या.
अधिकारी बांधावर पोहोचून पंचनामा करत नाही तोच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे. या वेळेला त्यांच्यासोबत नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे, जिल्हाधिकारी गंगाथरन डि यांच्यासह स्थानिक आमदार आणि अधिकारी उपस्थित आहे.
अनेक शेतकऱ्यांनी कांदा काढून शेतातच पोळ करून ठेवला होता मात्र अचानक आलेल्या पावसानं संपूर्ण कांदा भिजून गेला आहे. हा कांदा साठवण करून ठेवला जाणार असताना पाऊस पडल्याने आता हा कांदा खराब होण्याची अधिक शक्यता आहे.
याशिवाय बराच कांदा हा काढणीला आलेला असतानाच गारपीट झाल्याने कांदा शेतातच खराब होणार आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे डाळिंब आणि द्राक्ष पीक हे देखील हातात तोंडाशी आलेल्या असतानाच गारपीट आणि अवकाळी पाऊस झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने अनेक बागा उन्मळून पडल्या आहेत. त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे. त्याला मदतीची गरज असून तशी मागणी तो करत आहे. सरकारने पंचनामा करून तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जात आहे.
नाशिक जिल्ह्यातील शेतकरी या अवकळी पावसात मेटकुटीला आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी करीत आहे. त्यामुळे सरकार शेतकऱ्यांचे अश्रू पुसून त्यांना काय मदत करतात याकडे संपूर्ण शेतकरी वर्गाचे लक्ष लागून आहे.