‘अशी’ माणुसकी जीवंत राहायला हवी आणि पोलिसांची कर्तव्यदक्षताही, नाशकात नेमकं काय घडलं? होतोय कौतुकाचा वर्षाव…

| Updated on: Mar 15, 2023 | 9:14 AM

नुकतीच नाशिकमध्ये पालकांची चिंता वाढवणारी घटना घडली होती. मात्र, त्यानंतर समोर आलेले माणुसकीचे दर्शन आणि त्यासोबत पोलिसांनी दाखवलेली कर्तव्यदक्षता चर्चेचा विषय ठरत आहे.

अशी माणुसकी जीवंत राहायला हवी आणि पोलिसांची कर्तव्यदक्षताही,  नाशकात नेमकं काय घडलं? होतोय कौतुकाचा वर्षाव...
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : अलिकडच्या काळात मुलांना पालकांनी रागावलेले सुद्धा सहन होत नाहीये. पालकांनी कुठल्याही कारणावरुन रागावले तरी मुलं टोकाचा निर्णय घेत असस्तात. असाच काहीसा प्रकार पंचवटी पोलिस ठाण्यातच्या हद्दीत घडला होता. दीपक साबळे ही आपल्या मुलासह सोबत खेळणाऱ्या मुलीला रागावले होते. त्याचा राग आल्याने या दोन्ही मुलांनी घरं सोडलं होतं. पालकांच्या ही बाब उशिरा लक्षात आल्याने त्यांनी मुलांची शोधाशोध सुरू केली. मात्र, मुलांचा शोध लागत नसल्याने पंचवटी पोलिस ठाणे गाठले. आणि संपूर्ण हकीकत सांगितली. पोलिसांनी तत्परता दाखवली आणि शहर आणि ग्रामीण पोलिसांना ही बाब कळवली. तो पर्यन्त मुलांनी शहर सोडून ग्रामीण भागातील रस्त्याची वाट धरली होती.

भूक लागलेली असतांना दोन्हीही मुलं भेदरलेल्या अवस्थेत रस्त्याने चालतच होते. पालक आणि पोलिस शोधाशोध करत असतांना शहरापासून मुलांनी बरंच अंतर पार केले होते. मुलं कुठं गेली असतील याबाबत पालकांच्या मनात वेगवेगळे विचार सुरू होते.

मात्र, याचवेळेला माणुसकीचे दर्शन झाले आहे. आणि त्यासोबत पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेचे सुद्धा. घरं सोडून निघालेली खुशी उर्फ धनश्री रमेश सातपुते आणि आयुष दीपक साबळे हे निफाड तालुक्यातील चेहडी पर्यन्त पोहचले होते. तेथील ग्रामस्थानी दोघांची देहबोली पाहून त्यांना थांबविले.

बेदरलेल्या अवस्थेत मुलं बोलत होती, पोटात भूक होती. ही संपूर्ण परिस्थिती पाहून सतर्क ग्रामस्थांनी पोलिसांची संवाद साधत त्यांना अडकवून ठेवले. माहिती घेतल्यावर मुलं पळून आल्याचे लक्षात आल्याने पोलिसांना कळविले. पोलिसही तात्काळ दाखल झाले.

ग्रामस्थानी जिल्ह्याचे पोलिस अधिक्षक शहाजी उमाप, अप्परपोलिस अधिक्षक माधुरी कांगणे यांच्यासह सायखेडा पोलिस ठाण्याचे पी. वाय. कादरी यांनी तात्काळ सूत्रे हलवून मुलांना ताब्यात घेतले आणि शहर पोलिसांशी संपर्क केला.

तोपर्यन्त मुलांचे पालक हे पंचवटी पोलिस ठाण्यातच होते. त्यामुळे लागलीच त्यांनाही बोलावण्यात आले आणि सायखेडा पोलिस ठाण्यात मुलांना पालकांच्या स्वाधीन केले. खरंतर या घटनेत मुलांनी कुठलाही दूसरा टोकाचा निर्णय घेतला नाही ही बाब महत्वाची आहे.

अवघे दहा वर्षे वय असलेल्या दोन्ही मुलांनी घेतलेला टोकाचा निर्णय पालकांची चिंता वाढवणारा असला तरी दुसरीकडे माणुसकी जिवंत असल्याचे दिसून आले आणि पोलिसांची कर्तव्यदक्षता सुद्धा यानिमित्ताने समोर आली आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात यावरून ग्रामस्थांचे आणि पोलिसांचे कौतुक होत आहे.