नाशिक : साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धेपीठ म्हणून ओळख असलेल्या सप्तशृंगी गडावर आता नव्या सुविधांची भर पडली आहे. खान्देशची देवी म्हणू ओळख असलेली वणीची देवी म्हणूनही या देवीची ओळख आहे. दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येत असतात. दर्शनासाठी शेकडो पायऱ्या चढून जाव्या लागत होत्या. वृद्ध नागरिकांना तर पायऱ्या चढून जाणे शक्य नव्हते. त्यानंतर याच गडावर फनिक्युलर ट्रॉली सुरू करण्यात आल्यानंतर अनेक वृद्ध आणि अपंग नागरिकांना देवीचे दर्शन घेणे सोपे झाले होते. मात्र, आता भाविकांना आणखी सुविधा देण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये सप्तशृंग गडावर भाविकांसाठी सशुल्क दर्शन सुविधा सुरू करण्यात आली आहे.
100 रुपयांत व्हीआयपी दर्शनाची सुविधा मिळणार आहे. तर 20 रुपयांत प्रसादालयात भोजनाची व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. पास घेणाऱ्या व्यक्तींसोबत असणाऱ्या 10 वर्ष वयाखालील मुलांना निःशुल्क पास मिळणार आहे. त्यामुळे या नव्या सुविधांमुळे भाविकांची मोठी गैरसोय दूर होणार आहे.
वणीची देवी अर्थातच आई भगवती सप्तशृंगी देवीच्या दर्शनाला दररोज हजारो भाविक येत असतात. फनिक्युलर ट्रॉलीच्या माध्यमातून नागरिकांचे दर्शन अगदी कमी वेळेत होते आहे. याशिवाय आता या नव्याने सुरू करण्यात आलेल्या सुविधांमुळे भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.
व्हीआयपी दर्शन सुविधा सुरू करावी अशी मागणी अनेक नागरिकांनी केली होती. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आल्याने मोठ्या प्रमाणात भाविक येऊन दर्शन घेतील असा एक अंदाज वणी गडाच्या विश्वस्त मंडळींना आहे. यामध्ये महत्वाची बाब म्हणजे 20 रुपयांत भोजन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
विविध भागातून दर्शनासाठी अनेक भाविक येतात. मात्र, भोजनाची व्यवस्था 20 रुपयांत मिळणार असल्याने मोठा दिलासा मिळणार आहे. गडावर महागडे जेवण आणि इतर वस्तु मिळतात. त्यामुळे गोरगरिबांना याचा मोठा दिलासा मिळणार आहे. शिर्डीसारख्या ठिकाणी मिळणारा प्रतिसाद बघता हा निर्णय घेण्यात आला आहे.
नवरात्र उत्सव आणि चैत्रोत्सवात हजारो भाविक दर्शनासाठी हजेरी लावत असतात. फनिक्युलर ट्रॉलीच्या नंतर ही संख्या दुपटीने वाढली आहे. त्यात आता व्हीआयपी दर्शन आणि भोजन व्यवस्था सुरू करण्यात आल्याने आणखी गर्दी होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे कसा प्रतिसाद मिळतो याकडे लक्ष लागून आहे.
या देवीला मोठ्या प्रमाणात लोक पायी दर्शनाला येत असतात, खान्देश भागातून लोक दर्शनासाठी येत असतात. याशिवाय नाशिक पर्यटन केंद्र असल्याने अनेक भाविक पर्यटन करत असतांना वणीच्या गडावर दर्शनासाठी जात असतात.