नाशिक : देशात सध्या हिंदू मुस्लिम हा विषय चर्चेचा असतांना नाशिकमधील एक यात्रा नुकतीच पार पडली असून चर्चेत आली आहे. त्याचे कारण म्हणजे या गावातील यात्रा राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणारी यात्रा आहे. नाशिक जिल्ह्यातील वडनेर भैरव येथे ही यात्रा भरली जाते. शेकडो वर्षांची परंपरा दरवर्षी ही यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न होत असते. या गावात म्हणून कालभैरवनाथ महाराज आणि जोगेश्वरी माता यांची वार्षिक यात्रा सालाबादाप्रमाणे यंदाच्या वर्षीही संपन्न झाली आहे. आठ दिवस चालणाऱ्या या यात्रेला दोन लाखांहून अधिक लोकांनी दर्शनासाठी हजेरी लावल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्याच दरम्यान या यात्रेतील काही बाबी चर्चेचा विषय ठरत असतात.
या यात्रेत जो रथ निघतो त्या रथाचा मान मुस्लिम बांधवांना दिला जातो. रथाला पहिल्यांदा जी बैलजोडी जोडली जाते ती बैलजोडी मुस्लिम समजाची असते. तर हा रथ पुढे जात असताना अनेक महिला दंडवत घालत रथाबरोबर चालत असतात. तर पुरुष मंडळी हे लोटांगण घालत असतात.
खरंतर ही प्रथा अनेक वर्षांपासून या गावात सुरू आहे. हे दृश्य पाहण्यासाठी अनेक नागरिक मोठी गर्दी करत असतात. यामध्ये आठ दिवस चालणारी यात्रा महाराष्ट्रभर ओळखली जाते. रथ यात्रेचा सोहळा पाहण्यासाठी महाराष्ट्रातील नागरिक उपस्थिती लावतात.
यामध्ये कालभैरवनाथ कावड यात्रेने आणि गंगाजल अभिषेक ने कालभैरवनाथ यात्रेच्या घटस्थापनेची सुरुवात केली जाते. हिंदूधर्मीय विवाह पद्धतीप्रमाणे दरवर्षी कालभैरवनाथ महाराजांचे लग्न व त्यांचे सर्व विधी हे पारंपारिक पद्धतीने संपन्न होत असतात.
छबिना म्हणजेच पालखी सोहळ्यात भालेराव पाटील आणि मुसलमान पटेल यांनी विधीवत पूजा करून देवांचा साखरपुडा संपन्न केला जातो. पहाटे मानकरी महिलांनी कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यांचे तेलवण पाडण्याचा कार्यक्रम होत असतो.
वक्ते परिवाराच्या वतीने काल भैरवनाथ आणि जोगेश्वरी माता यांना रथ स्थापन करण्यात येतो. त्यापूर्वी शासकीय पूजा म्हणून अहिल्यादेवी होळकरांच्या वतीने पाटील घरण्याला मान आहे.
त्यानुसार नानासाहेब भालेराव पाटील यांच्या हस्ते कालभैरवनाथ जोगेश्वरी माता यांची विधिवत पूजा करण्यात येते. त्यांना मानाची पूजा म्हणून पगडी त्याचबरोबर नैवेद्य व नवीन वस्त्र देवासारपण करण्यात येते.
मुसलमान पटेल यांची पहिली मानाची बैल जोडी जुपून रथयात्रा मार्गस्थ करण्यात येते. यावेळी हजारो महिला भाविकांनी नवसाचे दंडवत तर नवसाचे लोटांगण पुरुष भक्तांकडून घातले जाते. बैलगाडा शर्यत, कुस्त्या आदि कार्यक्रम देखील येथे पार पडत असतात. त्यामुळे आगळी वेगळी यात्रा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत असते.