रामदास आठवले यांचं ठरलं! भाजप-सेनेच्या युतीत किती जागा हव्यात? अधिवेशनासह मंत्रीपदाबाबतही सांगून टाकलं…

| Updated on: Mar 18, 2023 | 3:32 PM

भाजप आणि शिवसेनेत जागा वाटपाच्या मुद्द्यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झालेले असतांना रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. आगामी निवडणुकीत किती जागा लढविणार आहे याबाबत भाष्य केले आहे.

रामदास आठवले यांचं ठरलं! भाजप-सेनेच्या युतीत किती जागा हव्यात? अधिवेशनासह मंत्रीपदाबाबतही सांगून टाकलं...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : सध्या राज्याच्या राजकारणात महायुती पासून ते महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या संदर्भात जोरदार चर्चा सुरू आहे. यावरून आरोप प्रत्यारोप सुरू असतांना नुकतेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी वक्तव्य केले होते. यावर शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी बावनकुळे यांनाच सुनावल्याने भाजपसेनेतील वातावरण चांगलेच तापले आहे. यामध्ये पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांच्यात चलबिचल झालेली असतांना संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांची लायकी काढली होती. फेकलेल्या तुकड्यावरच शिदे गटाला जगावं लागेल असे संजय राऊत म्हणाले होते. या वादावर रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

रामदास आठवले यांनी भाजप सेनेतील जागेच्या वरुन झालेल्या आरोप प्रत्यारोपावर भाष्य करत आम्हालाही जागा हव्या आहेत असं म्हंटलं आहे. भाजप आणि शिवसेनेच्या युतीत आम्हीही आहेत. लोकसभा, विधानसभा आणि महापालिकेत आम्हाला जाग्या हव्यात असे रामदास आठवले यांनी म्हंटलं आहे.

आगामी निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेसोबत आम्ही एकत्र राहणार असल्याचे रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. यामध्ये एक मंत्रीपद आणि एक विधान परिषद सदस्यत्व मिळावे अशी आमची अपेक्षा असल्याचं सांगत दोन ते तीन महामंडळ देखील मिळावे असं म्हंटलं आहे.

हे सुद्धा वाचा

लोकसभेसाठी भाजप आणि शिवसेनेने तीन जागा द्याव्यात. एक शिर्डी आणि एक मुंबई आणि एक इतर जागा मिळावी अशी मागणी केली आहे. त्यामध्ये भाजपने मत व्यक्त केलं आहे की आरपीआय शिवसेना आणि भाजप सोबत राहिली तरच फायदा होईल असंही रामदास आठवले यांनी म्हंटलं आहे.

चंद्रशेखर बावनकुळेंच्या 50 जागांच्या वक्तव्यामुळे शिवसेनेचे मंत्री नाराज असतील तर मी मध्यस्थी करून नाराजी दूर करेन अशी भूमिका आठवले यांनी व्यक्त केली असून 28 मे ला शिर्डीत अधिवेशन होणार असल्याची माहिती देत त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना बोलावणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

व्यापक पक्षबांधणी हा यामागील उद्देश आहे. दरम्यान बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राम्हणांचा कधीही विरोध केला नाही असेही रामदास आठवले यांनी म्हंटलं असून नाशिक महापालिकेत 22 जागा भाजपकडे मागणार असल्याचे म्हंटले आहे. आगामी काळातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रामदास आठवले यांनी या मागण्या केल्या आहेत.

नाशिक दौऱ्यावर आलेल्या रामदास आठवले यांनी रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या निवडणुका लढणार असल्याचे म्हंटले आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी मंत्रीपदाबाबतही मागणी केली आहे. त्यामुळे आगामी काळात आठवले यांना किती जागा आणि मंत्रिपद मिळतात हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.