नाशिक : केंद्र सरकारच्या वतीने शेतकऱ्यांना आर्थिक मदत व्हावी याकरिता पंतप्रधान किसान योजना सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार दरवर्षी शेतकऱ्यांना काही ठरवीत रक्कम ही त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. ती रक्कम काही जास्त नसते पण थोडा फार आधार गरीब कुटुंबातील शेतकऱ्यांना मिळतो. दोन हजार रुपये मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना आपली कामे सोडून बँकेचे उंबरठे झिजवावे लागतात. त्यामध्ये विशेष बाब म्हणजे स्टेट बँकेची त्र्यंबकेश्वर शाखा असेल तर विचारायची सुद्धा सोय नाही अत्यंत वाईट अनुभव तेथे गेलेल्या शेतकऱ्यांना येतोय. असाच एक प्रकार समोर आला असून त्यामध्ये शेतकऱ्याची अवस्था म्हणजे चारण्याची कोंबडी आणि बाराण्याचा मसाला अशी झाली आहे.
पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून हौसाबाई आनंदा शिंदे या आदिवासी भगातील शेतकरी महिलेच्या खात्यावर चार हजार रुपये जमा केले होते. अशातच काही दिवसांपूर्वी या महिलेचे निधन झाले होते.
महिलेचे पती यांनी बँकेत याबाबत चौकशी केली. आर्थिक विवंचनेत असलेल्या पतीने बँकेतील पैसे काढू म्हणून सांगितले होते. त्यामध्ये विशेष बाब म्हणजे पैसे काढण्यासाठी वारस नोंद लावावी लागेल तरच पैसे काढता येतील असा सल्ला दिला होता. पण त्याची पूर्तता करण्याची पद्धत पाहून शेतकऱ्याला घामच फुटला.
पण शेतकऱ्याने त्र्यंबकेश्वर तालुक्याचे तहसीलदार यांच्याकडे अर्ज केला. आणि त्यानुसार वारस असल्याचे पत्र दिले. पण हे पत्रही बँकेने मान्य न करता तहसीलदार दीपक गिरासे यांच्या पत्राला केराची टोपली दाखवली. त्यामुळे शेतकऱ्याला काय करावे सुचेना झाले.
त्यावेळी बँकेच्या अधिकाऱ्यांनी इंग्रजी पानांचा अर्ज दिला. त्यावर बाराशे रुपयांचा स्टॅम्पपेपर लावण्याचाही सल्ला दिला. म्हणजे जवळपास हा संपूर्ण खर्च साडेचार ते पाच हजार रुपये येणार आहे. त्यामुळे चार हजार रुपये काढण्यासाठी साडेचार ते पाच हजार रुपयांचा खर्च शेतकऱ्याला करावा लागणार आहे.
त्यामुळे शेतकऱ्याला मनस्ताप झालाच पण चारण्याची कोंबडी आणि बारण्याचा मसाला अशी गत झाली आहे. एकूणच शेतकऱ्याला किसान योजनेचे पैसे घेण्यासाठी दुप्पट खर्च येणार असल्याचे पाहून शेतकऱ्याची चेष्टा केली जात असल्याची भावना निर्माण झाली आहे.
वारस लावण्यासाठी अनेकदा ठिकाणी जो स्टॅम्प लागतो तो सरकारने बंद केलेला असतांनाही शेतकऱ्याकडे वारस दाखवण्यासाठी ज्या कागदपत्रांची पूर्तता केली आहे ती पाहून अनेक बँकेत आलेले अनेक शेतकरी संतापले होते.