नाशिक : धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिकवर पाणी कपातीचे संकट गडद झाले आहे. अल नीनो मुळे यंदाचा पावसाळा लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवल्या नंतर पाणी कपातीचे हे संकट आणखीनच गडद झाले आहे. हवामान विभागाने वर्तविलेली स्थिती लक्षात घेऊन नाशिक महानगर पालिकेच्या वतीने मे महिन्या पासून शहरात आठवड्यातून एक दिवस पाणी कपातीचा विचार सुरू केला आहे. त्याबाबत मंगळवारी बैठक होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून महिन्यात पाऊस न आल्यास जुलैपर्यंतची परिस्थिती लक्षात घेत तोपर्यंत आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाला पाठविण्यात आला आहे.
नाशिक शहराला पाणी पुरवठा करणार्या गंगापूर धरणात ५० टक्के जलसाठा आहे. शहराची रोजची गरज 540 एमएलडी पाणी इतकी आहे. ते पाहता 31 जुलैपर्यंत शहराला पाणी पुरवठा करणे शक्य आहे. मात्र, येणार्या काळात हवामान विभागाने अल निनोचा धोका वर्तवल्याने यंदाच्या हंगामात मान्सून लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत.
पावसाळा लांबणीवर पडल्यास पिण्याचा पाण्याचा तुटवडा भासणार नाही याचे नियोजन सध्याच्या घडीला केले जात आहे. महापालिकेच्या वतीने एप्रिल पासूनच पाणी कपात करण्याच्या हालचाली सुरू होत्या. मात्र, प्रशासनाला दिलेल्या प्रस्तावावर कुठलाही निर्णय झालेला नाहीये.
त्यामुळे पुन्हा एकदा शासनाकडे धरणांची स्थिती, हवामान विभागाने वर्तविलेला अंदाज बघता यंदाच्या वर्षी उशिराने मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचे संकट गडद होऊ शकते अशी स्थिती आहे. त्यामुळे पालिकेकडून पाण्याचे नियोजन केले जात आहे.
खरंतर धरणांचा जिल्हा म्हणून ओळख असली तरी राज्यातील बहुतांश शहरांचे पाणी राखीव आहे. सध्या उन्हाची परिस्थिती पाहता पारा वाढतच चालला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याच्या पातळीत घट होणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन पालिकेकडून केले जात आहे.
नाशिकच्या गंगापुर धरणाची पाणी पातळी बघता आणि उर्वरित कालावधी बघता पाण्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे मे महिण्यात आठवड्यातील एक दिवस, जून महिण्यात आठवड्यातील दोन दिवस पाणी कपात होण्याची शक्यता अधिक असून उद्या त्याबाबत फैसला होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मंगळवारी नाशिक महानगर पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडून याबाबत घोषणा होण्याची शक्यता असून पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे संपूर्ण नाशिककर पाणी कपात होणार की नाही या निर्णयाची वाट पाहत आहे.