नाशिक : अजित दादांबाबत आम्ही फक्त मिडियातूनच चर्चा ऐकत आहोत. मी अजित दादांचा खंदा समर्थक आहे, 2019 साली देखील पहाटेच्या शपथविधीला देखील मी हजर होतो. जर दादा यांनी काही निर्णय घेतला तरी नाशिक जिल्ह्याचे आमदार त्यांच्यासोबत असणार आहेट्. मोठ्या प्रमाणात आमदार दादांच्या संपर्कात आहेत. आमदारांना निधी उपलब्ध करून देण्यासाठी दादा निर्णय घेऊ शकतात. मी स्वतः देखील दादांच्या सोबत असणार आहे. दादांनी वेगळा निर्णय घेतला तरी राष्ट्रवादीत फूट पडेल असं वाटत नाही. दादा भाजपात गेल्यावर निश्चित भाजपाला फायदा होईल अशी प्रतिक्रिया कळवणचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार नितीन पवार यांनी म्हंटलं आहे.
फक्त दादांमुळे अनेक जण राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षामध्ये आहेट्. जिथे अजित दादा तिथे नितीन पवार निश्चित आहे अशी प्रतिक्रिया नितीन पवार यांनी दिली आहे. नितीन पवार हे अजित पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यामुळे नितीन पवार यांनी ही स्पष्ट भूमिका घेतली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे भाजप सोबत सरकार स्थापन करणार अशा चर्चा सुरू असतांना नितीन पवार यांनी ही भुवया उंचवणारी प्रतिक्रिया दिली आहे. खरंतर नितीन पवार हे 2019 ला पहाटेच्या शपथ विधिला अजित पवार यांच्यासोबत होते.
नाशिक जिल्ह्यातील एकूण सहा आमदार राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे आहेत. त्यामध्ये छगन भुजबळ, दिलीप बनकर, नितीन पवार, माणिकराव कोकाटे, नरहरी झिरवळ, सरोज अहिरे यांचा समावेश आहे. त्यापैकी भुजबळ सोडून सर्वच आमदार हे अजित पवार यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात.
अजित पवार हे सध्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते आहेत. महाविकास आघाडीतीळ प्रमुख नेते म्हणून अजित पवार आहेत. अशातच राज्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी पार पडली असून कोणत्याही क्षणाला निर्णय येण्याची शक्यता असतांना भाजप कडून बी प्लॅन असल्याचे बोलले जात आहे.
भाजप राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत सरकार स्थापन करणार असल्याचे बोलले जात आहे. तसे वृत्त एका वृत्तपत्राने दिले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. त्यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली होती. अनेक आमदार अजित पवार यांना जाऊन भेटत होते.
यामध्ये नाशिक जिल्ह्यातील कवळणचे आमदार नितीन पवार हे देखील होते. यापूर्वी नाशिकमधील माणिकराव कोकाटे आणि दिलीप बनकर हे देखील 2019 च्या शपथविधीला उपस्थित होते.