नाशिकः ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर नाशिकमध्ये (Nashik) पोलीस आयुक्त (Commissioner of Police) दीपक पांडेय यांनी नगरसेवकांना तडीपारीची नोटीस बजावल्याने राजकीय क्षेत्रात भूकंप झाला आहे. या नोटीसला मंगळवारपर्यंत उत्तर द्यायचे आहे. मात्र, तत्पूर्वीच त्यावरून राडा सुरूय झालाय. संतापलेल्या शिवसेना (Shiv Sena) पदाधिकाऱ्यांनी शनिवारी पोलीस आयुक्तांची भेट घेण्यासाठी त्यांच्या कार्यालयावर धडक मारली. मात्र, पोलीस आयुक्तांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांची भेट टाळली. त्यामुळे पोलीस आयुक्तांच्या दालनाबाहेरच शिवसेना संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, सुधाकर बडगुजर, अजय बोरस्ते यांच्यात खडाजंगी झाली. विशेषतः विजय करंजकर आणि पोलीस आयुक्तांमध्ये तू-तू-मै-मै रंगली. दरम्यान, येणाऱ्या काळात या प्रकरणावरून वादंग होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
कोणाला बजावली नोटीस?
नाशिक शहर पोलिसांनी शिवसेना आणि भाजप नगरसेवकांना तडीपारीच्या कारवाईबाबत एक नोटीस बजावली आहे. त्यात एका नगरसेविकेच्या पतीलाही नोटीस बजावण्यात आली आहे. त्यात शिवसेनेचे नगरसेवक आणि युवासेनेचे जिल्हाप्रमुख दीपक दातीर, भाजप नगरसेवक मुकेश शहाणे, महिला नगरसेवक किरण दराडे यांचे पती योगेश उर्फ बाळा दराडे यांच्या समावेश आहे.
नोटीसचे कारण काय?
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले होते. त्यावरून दीपक दातीर आणि बाळा दराडे यांनी भाजप कार्यालयावर दगडफेक केली. तोडफोड झाली. त्यांच्यावर इतरही गुन्हे दाखल आहेत. तर भाजपचे मुकेश शहाणे यांनी जमावबंदीचे उल्लंघन केले होते. शहरात ठिकठिकाणी मोर्चे काढून शांतता भंग केली. त्यामुळे या सर्वांना किमान दोन वर्षांसाठी तडीपार का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस पोलीस आयुक्तांनी पाठवली आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
राजकीय पारा चढला
सध्या शिवसेना आणि भाजपचे नगरसेवक निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. प्रारूप आराखडा जाहीर झाला आहे. त्यावर हरकती दाखल होऊन सुनावणी झाल्यानंतर कधीही निवडणूक लागण्याची शक्यता आहे. मात्र, तत्पूर्वीच पोलीस आयुक्तांनी नोटीस बजावल्याने कार्यात विघ्न आले आहे. ही नोटीस का बजावली, याचाच जाब विचारायला शिवसेना पदाधिकारी आज पोलीस आयुक्तालयात धडकले होते. त्यावरून शिवसेना जिल्हाप्रमुख विजय करंजकर, त्यांचे इतर सहकारी आणि पोलीस आयुक्तांमध्ये दालनाबाहेरच खडाजंगी झाली. पोलीस आयुक्तांनी भेट नाकारल्याने पदाधिकारी संतापले होते.
Wine Capital Nashik | नाशिक वाईन कॅपिटल कसे झाले; ऐतिहासिक ‘पिंपेन’ची कशी झाली सुरुवात?
Nashik | नाशिक क्लायमेट ॲक्शन प्लॅन सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या, काय होणार लाभ?