आज मकरसंक्रांतीनिमित्त ठिकाठिकाणी पतंग उडवण्याची मोठी परंपरा आहे. मात्र पंतग उडवताना आता नायलॉनचा मांजा हा दिवसेंदिवस घातक ठरताना दिसत आहे. नाशिक शहरात नायलॉन मांजावर बंदी असताना देखील शहरात मांजाचा सर्रास वापर सुरू आहे. या नायलॉन मांजामुळे एका २३ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. सोनू किसन धोत्रे असे या तरुणाचे नाव आहे. नाशिकच्या पाथर्डी इंदिरानगर परिसरात ही घटना घडली. यासोबतच राज्यात अनेक ठिकाणी मांजामुळे विविध दुर्घटना घडल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सोनू धोत्रे हा पाथर्डी इंदिरानगर भागातून जात असताना नायलॉन मांजाने त्याच्या गळ्यावर गंभीर जखम झाली. यामुळे तो गंभीररित्या जखमी झाला. यानंतर त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरु होण्यापूर्वीच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. नायलॉन मांजाच्या वापरामुळे वारंवार होणाऱ्या अशा घटनांवर कठोर प्रतिबंध लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
सोनू धोत्रेचा नायलॉन मांजामुळे मोठा रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला. आम्ही ज्या मांजामुळे ही घटना घडली, तो मांजा ताब्यात घेतला. सध्या हा तपास सुरु आहे. आम्ही मांजा विक्रेत्यांवर कारवाई केली आहे. आतापर्यंत ९ जणांवर कारवाई केली आहे. मांजा वापरणारे हे सर्व लोक सुशिक्षित आहेत. लवकरच यावर कारवाई केली जाणार आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून यांच्यावर कारवाई करणार आहेत.
तर दुसरीकडे नायलॉन मांजाने पतंग उडवणाऱ्यांवर नाशिक पोलिसांची धर-पकड कारवाई सुरु केली आहे. नायलॉन मांजावर बंदी आहे. तरीदेखील मांजाचा वापर केला जात आहे. त्यामुळे ही कारवाई केली जात आहे. आज सकाळपासून पोलिसांची नाशिक शहरात कारवाई सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी नायलॉन मांजामुळे गळा कापला गेल्याने तरुणाला ७५ टाके पडले होते.
नागपूर पोलीस दलात कार्यरत महिला पोलीस कॉन्स्टेबल नायलॉन मांजामुळे जखमी झाल्या आहेत. शीतल खेडकर असं जखमी महिला पोलीस कर्मचारी यांचं नाव आहे. त्या सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होत्या. आज दुचाकीवरून ड्युटीवर येत असताना नायलॉन मांजामुळे त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार केले असून प्रकृती धोक्याबाहेर आहे.
दाजी आणि बहिणीला भेटण्यासाठी आलेल्या 16 वर्षीय युवकाचा बंदी असलेला नायलॉन मांजा गळ्याला अडकल्याने गळा चिरल्याची धक्केदायक घटना समोर आली आहे. लासलगाव-विंचूर रोडवर विंचूर येथील पार्वती स्टीलजवळ घडली आहे. नायलॉन मांजामुळे गळ्याला गंभीर जखम झाली आहे. रेहान शेख असे या तरुणाचे नाव असून त्याच्या गळ्याला डाव्या बाजूने 41 टाके पडले आहेत. यामुळे येवल्यानंतर आता लासलगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत बंदी असलेला नायलॉन मांजा सर्रास वापरला जात असल्याची बाब समोर आली आहे. लासलगाव पोलीस आता बंदी असलेल्या नायलॉन मांजा विक्रेत्या आणि वापरकर्त्यांविरोधात कठोर कारवाई करणार का? असा प्रश्न उपस्थितीत होत आहे.
वसईत पतंग महोत्सवात नायलॉन मांज्याचा वापर केल्याप्रकरणी स्मार्ट सिटीच्या कन्सेपच्युल ॲडव्हायसरी सर्व्हिसेस विरोधात वाळीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वसईच्या मधूबन परिसरात पत्नी आणि मुलासह दुचाकीवरून फेरफटका मारायला गेलेला दुचाकीस्वारचा नायलॉन मांज्यामुळे गळा चिरला गेला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी घडली होती वसई पूर्वेच्या गोखिवरे परिसरात राहणारे विक्रम डांगे (वय ३६) हे यात जखमी झाले असून, त्यांच्या गळ्याला 9 टाके पडले होते. त्यांच्या पत्नी नितल डांगे यांच्या तक्रारीवरून स्मार्ट सिटीच्या कन्सेपच्युल ॲडव्हायसरी सर्व्हिसेस विरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५, १५५ (बी) अन्वये वालीव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
नागपुरात ऐन मकर संक्रांतीच्या दिवशी हबिबनगर परिसरातील एका घरातून 145 चकऱ्या जप्त करण्यात आल्या आहेत. नागपुरात पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून जनजागृती करून सुद्धा आजच्या दिवशीही नायलॉन मांजाची विक्री करताना एकाला अटक केली. अब्दुल अन्सारी वय 40 असे अटक केलेल्या आरोपीच नाव आहे. पोलिस पथक गस्तीवर असताना एका घरातून मांजा विक्री होत असल्याचा संशय आला. त्या माध्यमातून चौकशी केली असता आणि त्या घरात जाऊन झाडाझडती घेतली असता सहा पोत्यांमध्ये 145 चाकऱ्या मिळून आल्या. पोलिसांनी तब्बल 2 लाख 17 हजाराचा मुद्देमाल जप्त करत कारवाई केली आहे.
नागपूर शहरात मकर संक्रांतीच्या दिवशी नायलॉन मांजामुळे गळा कापण्याची भिती असते. त्यामुळे नागपूर पोलीस आणि सामाजिक संस्थेच्या वतीने लोकांच्या दुचाकीवर यु आकाराचा तार बांधून त्यांना एक प्रकारे सुरक्षा पुरवताना दिसत आहे. गळ्याच्या सुरक्षेसाठी नेक बँड लावून सुरक्षेचा संदेशही दिला जात आहे. नागपुरातील शताब्दी चौकामध्ये उपक्रम राबविण्यात आला आहे.