नाशिक : नाशिक महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात (Nashik Zakir Hussain hospital) ऑक्सिजनची गळती झाल्यामुळे ऑक्सिजनअभावी तब्बल 24 कोरोनाग्रस्तांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणाचा चौकशी अहवाल राज्य शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे. यात ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे तब्बल 24 कोरोनाग्रस्तांचा दुर्देवी मृत्यू झाला, असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. (Nashik oxygen leak tragedy high level inquiry committee report submitted to Government)
चौकशीचा अहवाल सरकारकडे सुपूर्द
नाशिकमधील दुर्घटनेच्या चौकशीसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. या चौकशी समितीत ठेकेदारावर ठपका ठेवण्यात आला आहे. ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे नाशिकच्या डॉ. झाकीर हुसैन रुग्णालयात ऑक्सिजनची गळती झाली. त्यामुळे 24 लोकांना दुर्देवाने प्राण गमवावा लागला, अशी माहिती चौकशी अहवालातून समोर आली आहे.
नाशिकमधील दुर्घटनेचा चौकशी अहवाल दाखल करण्यासाठी शासनाने 15 दिवसांच्या मुदत दिली होती. पण 15 दिवसांच्या मुदतीपूर्वीच हा अहवाल शासनाकडे दाखल करण्यात आला आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली हा अहवाल तयार करण्यात आला आहे.
नाशिकमधील दुर्घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 22 एप्रिलला चौकशीसाठी 7 सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती नेमण्यात आली होती. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती चौकशी करेल. या समितीमध्ये वैद्यकीय अधिकारी, तांत्रिक दोष निर्माण झाल्यामुळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे प्राचार्य, महापालिकेचे अभियंता आणि ऑक्सिजन प्लांट उभारणीचं काम करणाऱ्या लोकांचा समावेश होता.
नेमकं काय घडलं?
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात 21 एप्रिल दुपारी 12.30 च्या सुमारास ऑक्सिजनची गळती झाल्याचा प्रकार घडला. यानंतर काही तास रुग्णालयात गोंधळ पाहायला मिळाला. रुग्णालयात व्हेंटिलेटवर असलेले अनेक रुग्ण हे ऑक्सिजन अभावी तडफडत होते. तर दुसरीकडे ही गळती थांबवण्यासाठी प्रशासनाकडून अथक प्रयत्न केले जात होते. जवळपास एक दीड तासानंतर ही ऑक्सिजन गळती थांबवण्यात आली. या रुग्णालयात कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु होते. त्यात 150 लोक व्हेंटिलेटरवर होते. त्यातील 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 30 जण मृत्यूच्या दाढेत असल्याचे बोललं जात आहे.
नाशिकच्या झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजन गळती झाल्यानंतर या रुग्णालयात अग्निशमन दल दाखल झाले होते. या ठिकाणी ऑक्सिजन टाकीतील गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरु होते. जवळपास एक दीड तासाने ही ऑक्सिजन गळती रोखण्यास अग्निशमन दलाला यश आले. दरम्यान या घटनेमुळे रुग्णालयात ऑक्सिजनवर असलेल्या रुग्णांचा जीव टांगणीला लागला होता. (Nashik oxygen leak tragedy high level inquiry committee report submitted to Government)
संबंधित बातम्या :