नाशिक : मकर संक्रांत सणाच्या पार्श्वभूमीवर पतंग उत्सवासाठी बंदी असताना देखील नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्या विरोधात आता नाशिक शहर पोलिसांनी चांगला फास आवळला आहे. नाशिक शहर पोलिसांनी रविवारी सहा संशयतांना तडीपार केले आहे. त्याचप्रमाणे नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या अन्य एकाला अंबड पोलिसांनी सापळा रचत अटक केली आहे. नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी नायलॉन मांजा खरेदी-विक्री आणि साठा करणाऱ्यांना चांगलाच दणका दिला आहे. नायलॉन मांजाचा साठा करण्याचा मनाई आदेश निर्गमित केला आहे. आता नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या तसेच साठा करणाऱ्यांवर तडीपारीची कारवाई करण्यात येण्याचे आदेश देखील दिले आहे.
असे असताना देखील शहरात छुप्या पद्धतीने मोठ्या प्रमाणात नायलॉन मांजाची विक्री होत आहे त्यामुळे सहा जणांवर नाशिक पोलिसांनी तडीपारीची कारवाई केली आहे.
नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या संशयितला अंबड पोलिसांनी अटक केली आहे.
त्याच्याकडून तब्बल 42 हजार रुपयाचे नायलॉन मांजाचे 85 रीळ पोलिसांनी हस्तगत केले. असून येत्या काळात मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.
नाशिक शहरात मागील वर्षी जवळपास दोनशे अधिक जणांना नायलॉन मांजा पासून इजा झाली होती, त्यात नगरिकांबरोबर पक्षांचा मोठा समावेश होता.
एकूणच नायलॉन मांजाचा वापर बंदी असतांनाही सर्रास वापरला जात असल्याने नाशिक शहर पोलीसांनी कंबर कसली आहे. त्यामुळे येत्या काळात नायलॉन मांजा विक्रीला आळा बसेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
मकर संक्रात तोंडावर आलेली असतांना नाशिक शहर पोलीसांनी हाती घेतलेली मोहीम पाहून नागरिक त्यांचे स्वागत करत असून कठोर कारवाई करण्याची मागणी करत आहे.