नाशिकः नाशिक (Nashik) येथील कर्मवीर काकासाहेब वाघ (K. K. Wagh) शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे रविवारी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले आहे. ते 90 वर्षांचे होते. त्यांच्यावर आज पंचवटी येथील के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी तीन वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांचे अंत्यदर्शन दुपारी 12 वाजल्यापासून घेता येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. सिन्नर तालुक्यातील मेंढी गावी त्यांच्या 19 ऑक्टोबर 1932 रोजी जन्म झाला. त्यांचे वडील देवराम उर्फ पद्मश्री काकासाहेब वाघ व आई गीताई वाघ. वडिलांचा शैक्षणिक वारसा त्यांनी समर्थपणे पुढे नेला. त्यांना लहानपणापासून कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. पंजाबराव देशमुख, कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर भाऊसाहेब हिरे, कर्मवीर दादासाहेब गायकवाड, क्रांतीसिंह नाना पाटील, कुसुमाग्रज आणि आयोजा सयाजीबाब वाघ अशा ज्येष्ठांचा सहवास लाभला होता.
वारसा समर्थपणे चालवला
वडील देवराम उर्फ पद्मश्री कै. कर्मवीर काकासाहेब वाघ यांचा वारसा बाळासाहेब वाघ यांनी पुढे समर्थपणे चालवला. त्यांच्या प्रेरणेने 1970 मध्ये के. के. वाघ या शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्यांनी 2006 पर्यंत संस्थेचे उपाध्यक्षपद भूषविले. त्यानंतर आजपर्यंत अध्यक्ष म्हणून काम पाहिले. त्यांचे बीएस्सी अॅग्रीपर्यंत शिक्षण झाले होते. त्यांनी आपल्या कामाची सुरुवात अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर येथील महाराष्ट्र साखर कारखान्यावर कृषी अधिकारी पदापासून केली. पुढे अनेक कारखान्यांवर काम केले. ते तब्बल 22 वर्षे कर्मवरी काकासाहेब वाघ सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष होते. जिल्ह्यातील विविध बँकांवरही त्यांनी काम करून आपल्या कार्याची छाप पाडली. त्यांना विविध पुरस्काराने गौरविण्यात आले होते. आज त्यांच्या निधनाने सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे.
पालकमंत्र्यांनी वाहिली श्रद्धांजली
पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बाळासाहेब वाघ यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आपल्या शोकसंदेशात पालकमंत्री म्हणाले की, कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब वाघ यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यावर सुश्रुत हॉस्पिटल येथे उपचार सुरू असताना कालच त्यांची भेट घेऊन तब्येतीची विचारपूस केली होती. आज मात्र त्यांच्या निधनाची दुर्दैवी बातमी समजली. अतिशय दुःख झाले. सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात काम करताना त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य वेचले. कर्मवीर काकासाहेब वाघ शिक्षण संस्थेच्या रोपट्याचे वटवृक्षात रूपांतर करण्यास त्यांनी अथक प्रयत्न केले. शिक्षण क्षेत्रात त्यांनी केलेल्या कामामुळे अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव देखील करण्यात आलेला होता. त्यांच्या निधनाने नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्राची कधीही न भरून निघणारी हानी झाली आहे. त्यांच्या निधनाने वाघ कुटुंबियांवर तसेच के. के. वाघ शिक्षण संस्थेच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मी व माझे कुटुंबीय त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो.
Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास
Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली