नाशिकः नाशिककरांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी. नाशिक-सिन्नर (Nashik – Sinnar)चौपदरीकरणात गेल्या दोन वर्षांपासून रखडलेले चेहडी पूल ते सिन्नरफाटापर्यंतचे काम आता अगदी शेवटच्या टप्प्यात आले आहे. येत्या मार्च महिन्यापर्यंत हे काम पूर्णत्वास जाईल, अशी शक्यता आहे. त्यामुळे अवघ्या 20 मिनिटांत हे अंतर कापले जाणार असून, नागरिकांची मोठ्या वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. नाशिक-पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यामुळे सिन्नर, पुणे, शिर्डी आणि संगमनेर ही शहरे जोडली गेली आहेत. येणाऱ्या काळात या महामार्गामुळे परिसरातील विकासालाही चालना मिळणार आहे.
का रखडले होते काम?
नाशिक-पुणे चौपदरीकरणाचे काम नाशिक ते सिन्नरफाटा दरम्यान गेल्या कित्येक दिवसांपासून रखडले होते. चेहडी ते सिन्नरफाटा दरम्यान अनेक झाडे होती. या कामासाठी ही झाडे तोडावी लागणार होती. त्यासाठी परवानगी मिळाली नव्हती. ही परवानगी मिळाली. काम सुरू होईल, असे वाटले. मात्र, पुन्हा काही तांत्रिक बाबीमुळे या कामात खोडा निर्माण झाला. अखेर सगळ्या अडचणी दूर झाल्यामुळे अंतिम टप्प्यातील या कामाला आता वेग आला आहे. त्यामुळे हे काम पूर्णत्वास गेल्यास नाशिकरोड ते सिन्नर ते 23 किलोमीटरचे अंतर अवघ्या 20 ते 25 मिनिटांत गाठणे शक्य होणार आहे.
विकासालाही चालना
रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानतर सिन्नरला जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सिन्नर एमआयडीसीमध्ये काम करण्यासाठी नाशिकमधून अनेकजण जातात. मात्र, सध्या त्यांना या रस्त्यावरून प्रवास करताना प्रचंड वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. येणाऱ्या काळात ही कोंडी फुटेलच. सोबत सिन्नर एमआयडीसी व नाशिकरोड पूर्व भागाच्या विकासालाही चालना मिळणार आहे. मात्र, दुसरीकडे या कामासाठी केलेल्या वृक्षतोडीमुळे पर्यावरण प्रेमींनी नाराजी दर्शवली आहे. कुठलीही विकासकामे करताना झाडे आणि डोंगर वाचवावी. तसे करून कामे केल्यास खऱ्या अर्थाने विकास होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे.
चौपदरीकरणाचे लाभ
– सिन्नर, पुणे, शिर्डी आणि संगमनेर शहरे जोडली.
– नाशिक-सिन्नर हे 23 किलोमीटरचे अंतर.
– अवघ्या 20-25 मिनिटांत कापता येणार.
– वाहतूक कोंडीतून होणार सुटका.
– सिन्नर एमआयडीसीचा विकास होणार वेगात.
– झाडे तोडल्याने पर्यावरणप्रेमी नाराज.
इतर बातम्याः
Nashik MHADA | म्हाडा भूखंडात कोट्यवधींचा घोटाळा; मंत्री आव्हाडांचा सलग 2 ट्वीटमधून बॉम्बगोळा!
Nashik | ऑनलाईन शिक्षणाने मारले, 11 वीच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; 2 महिन्यांतली तिसरी घटना