Nashik Rail Roko Andolan : गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे विस्कळीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यातच आज नाशिकमध्ये रेलरोको आंदोलन करण्यात आले. मनमाड नाशिकदरम्यान काही चोरट्यांनी राज्यराणी एक्सप्रेसमध्ये चोरी करत प्रवाशावर चाकू हल्ला केला. यावेळी चोरट्यांना पकडण्यासाठी रेल्वेतील प्रवासी आक्रमक झाले. त्यांनी राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरली. यामुळे मध्य रेल्वेच्या इतर गाड्यांना उशिरा झाल्याचे पाहायला मिळाले. याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधील मध्य रेल्वेच्या खेरवाडी रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त प्रवाशांनी सकाळी 6.15 वाजेपासून राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरली होती. मनमाड-नाशिक दरम्यान 8 ते 10 चोरट्यांनी राज्यराणी एक्सप्रेसमध्ये चोरी केली. यावेळी एका प्रवाशाला मारहाण करण्यात आली. हे चोर पहाटे राज्यराणी एक्सप्रेसमध्ये शिरले. त्यांनी चोरी व मारहाण केली. त्यानंतर काही लहान मुलांना घेऊन हे आठ ते दहा चोरटे फरार झाले. या मारहाणीत एका प्रवाशावर चाकू हल्ला करण्यात आला.
राज्यराणी एक्सप्रेस अडीच तासानंतर रवाना
यावेळी चोरट्यांना पकडण्यासाठी प्रवासी आक्रमक झाले. त्यांनी राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरली. राज्यराणी एक्सप्रेस रोखून धरल्याने पंचवटी एक्सप्रेस, हावडा एक्सप्रेस यांसह पाच ते सहा एक्सप्रेस गाड्यांना उशीर झाला. यानंतर रेल्वे पोलिसांच्या कारवाईचे आश्वासन दिले. या आश्वासनानंतर 6.15 पासून थांबलेली राज्यराणी एक्सप्रेस अडीच तासानंतर अखेर रवाना झाली.