नाशिकः नाशिक (Nashik) महापालिकेच्या (Municipal Corporation) कोषागार विभागात (Treasury Department) घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. महापालिकेत नियमित भरणा झालेली विविध रक्कम येथे जमा होत नसल्याचे समजते. या कर्मचाऱ्यांनी कोणाच्या सांगण्यावरून असे केले, याची चर्चा सुरू आहे. मात्र, दुसरीकडे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी याप्रकरणी चौकशी करण्यात येईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू, अशा इशारा टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिला आहे. येणाऱ्या काही दिवसांत महापालिकेची निवडणूक होतेय. प्रारूप आराखड्यावर आक्षेप मागविले गेले आहेत. तत्पूर्वीच हे प्रकरण समोर आले असल्याने याची मोठ्या चवीने चर्चा सुरू आहे. आता याप्रकरणामागे कोणाचे हात आहेत, कोणाच्या सांगण्यावरून हे सारे सुरू आहे, चौकशीत कोण समोर येणार याची उत्सुकता आहे.
नेमका कसा केला घोटाळा?
महापालिकेच्या लेखा विभागाने या घोटाळ्याचे बिंग फोडल्याचे समजते. महापालिकेत नियमित भरणा व्हायचा. मात्र, ही रक्कम जमा केली जायची नाही. याप्रकरणी संबंधित कर्मचाऱ्याला जाब विचारण्यात आला. हा कर्मचारी एलबीटी विभागातही होता. त्याने तिथेही असेच प्रताप केले आहेत. त्यामुळे त्या विभागाची प्रत्येक पावती तपासली जात आहे. याप्रकरणाची चौकशी सुरू झाली. तेव्हाही संबंधिताने चौकशीस सहकार्य केले नसल्याचे समजते. सध्या या विभागाचा कार्यभार उपायुक्त अर्चना तांबे यांच्याकडे आहे. त्यांनी संबंधित कर्मचाऱ्यास सक्त ताकीद दिली. तेव्हा त्याने आवश्यक त्या फाईल आणि कागदपत्रे सादर केली आहेत.
चौकशी सुरू होणार
दरम्यान, याप्रकरणाची खात्यांतर्गत चौकशी सुरूच आहे. आता महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलतानाही चौकशी करण्यात येईल असे सांगितले आहे. जाधव म्हणाले की, महापालिकेतील या प्रकरणाची माहिती मागवण्यात येईल. त्याची रितसर चौकशी करण्यात येईल. यामागे जे कोणी असतील आणि दोषी सापडतील त्यांच्यावर नियमाप्रमाणे कडक कारवाई केली जाईल. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला आहे.
कोषागार प्रकरणी चौकशी करण्यात येईल. जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करू. कोणालाही पाठिशी घातले जाणार नाही.
– कैलास जाधव, महापालिका आयुक्त, नाशिक
Lata Mangeshkar | अवघ्या 13व्या वर्षी पहिलं रेकॉर्डिंग! असा होता 80 वर्षांचा म्युझिकल प्रवास
Lata Mangeshkar | निर्विवाद तजेलदार! आईसाठी तर आवाज दिलाच, पण लेकीसाठीही लतादीदींनी गाणी गायली