नाशिकः नाशिक जिल्ह्यात 2021 च्या जिल्हा क्रीडा पुरस्कारांची (Sports Awards) घोषणा करण्यात आली असून, यात 4 गुणवंत खेळाडूंचा गौरव केला जाणार आहे. या पुरस्काराचे वितरण दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी करण्यात येते. मात्र, यंदा कोरोनाच्या वाढत्या प्रार्दूभावामुळे कोरोना निर्बंध शिथिल झाल्यानंतर खेळाडूंचा गौरव करण्यात येणार असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी कळवले आहे.
चार प्रकारांत गौरव
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, नाशिकव्दारा दरवर्षी हे पुरस्कार देण्यात येतात. जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडा मार्गदर्शक यांनी क्रीडा क्षेत्रात केलेल्या कार्याचे तसेच योगदानाचे मूल्यमापन होवून त्यांचा गौरव व्हावा व त्यांना क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे, या करिता हा जिल्हा क्रीडा पुरस्कार देण्यात येतो. जिल्हा क्रीडा पुरस्काराचे स्वरुप प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, रोख रुपये 10 हजार असे आहे. 24 जानेवारी 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार सुधारित तरतुदीनुसार जिल्हा क्रीडा पुरस्काराचे गुणवंत खेळाडू-पुरुष व महिला व दिव्यांग खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक या चार प्रकारामध्ये वितरण करण्यात येते.
एकूण 18 अर्ज प्राप्त
जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी गुणवंत खेळाडू पुरुष, महिला आणि दिव्यांग खेळाडू, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यासाठी जिल्हाभरातून अर्ज मागविण्यात आले होते. यात गुणवंत खेळाडू पुरस्कारासाठी 15, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कारासाठी 01 व दिव्यांग खेळाडू पुरस्कारासाठी 02 असे एकूण 18 अर्ज प्राप्त झालेले आहेत. या अर्जांची जिल्हा क्रीडा पुरस्कार छाननी समिती मार्फत छाननी करण्यात आली असून, यात एक पुरूष खेळाडू एक महिला खेळाडू एक क्रीडा मार्गदर्शक व एक दिव्यांग खेळाडू असे एकूण चार पुरस्कार जाहीर करण्यात आले असल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी पल्लवी धात्रक यांनी सांगितले आहे.
या खेळाडूंचा होणार गौरव
1) गुणवंत खेळाडू पुरस्कार महिला
– ऐश्वर्या सुधाकर शिंदे
– दौलत नगर, सोयगाव ता. मालेगाव
– बेसबॉल
2) गुणवंत खेळाडू पुरस्कार पुरुष
– रवींद्र ज्ञानेश्वर कडाळे
– मु. पो. पाचोरे वणी, ता. निफाड
– कॅनोईंग व कयाकिंग
3) गुणवंत खेळाडू पुरस्कार
– दिव्यांग खेळाडू
– गौरी सुनील गर्जे
– सातपूर, नाशिक
– पॅरा जलतरण
4) गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार
– शरद भास्करराव पाटील
– पंचवटी, नाशिक
– कबड्डी
Balasaheb Thackeray | उभ्या महाराष्ट्रावर गारूड करणारा बाळासाहेब नावाचा झंझावात…!
Jitendra Awhad | नाशिक महापालिकेने म्हाडाचे 700 कोटींचे नुकसान केले; आव्हाडांचा हल्लाबोल, चौकशी