नाशिक : नाशिकच्या (Nashik) गंजमाळ परिसरातील एका इलेक्ट्रिक दुकानाला मोठी आग लागल्याची घटना घडलीये. रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. दुकानाच्या तिसऱ्या मजल्याला आग लागली होती. या आगीमध्ये मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांच्या इलेक्ट्रिकल (Electric) वस्तू जळून खाक झाल्या. ही आग विझवताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागलीये. अग्निशमन विभागाच्या 4 गाड्यांनी आग विझवली. सुदैवाची गोष्ट म्हणजे जीवितहानी झाली नाहीये. मात्र, ही आग (Fire) नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.
रविवार असल्यामुळे हे इलेक्ट्रिकल दुकान बंदच होते. तिसऱ्या मजल्यावरून धूर निघत असल्याचे काही लोकांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिस आणि अग्निशामक दलाला याबद्दलची माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.
आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर काही वेळेने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. महापालिकेच्या पंचवटी, सातपूर, के. के वाघ केंद्र आणि मुख्यालय येथून 4 गाड्या आल्या होत्या. शिवाय या गाड्यांसोबतच अग्निशामक दलाचे 20 कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते.
नाशिक येथील गंजमाळ परिसरातील इलेक्ट्रिक दुकानाला लागलेल्या आगीचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाहीये. यासंदर्भात संपूर्ण तपास आता नाशिक पोलीस करत आहेत.