मालेगाव / मनोहर शेवाळे : कांदा विक्रीसाठी बाजार समितीत घेऊन जाणाऱ्या एका शेतकऱ्याच्या ट्रॅक्टरला पिक-अप वाहनाने धडक दिल्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावरील जळगाव खुर्द गावाजवळ मध्यरात्री ही घटना घडली. एकनाथ सोनावणे असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अज्ञात पीकअप चालकाविरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शेतकऱ्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
सोनावणे हे हिंगणे-देहरे येथून नांदगाव बाजार समितीत कांदा विक्रीसाठी घेऊन चालले होते. कांदा विकला जावा यासाठी शेतकरी रात्रीच बाजार समितीत नंबर लावण्यासाठी जात असतात. कांदा विकून पैसे मिळावे यासाठी शेतकऱ्यांची सध्या धडपड सुरू असते. बाजार समितीत जात असतानाच चाळीसगाव-नांदगाव रस्त्यावर अज्ञात पिकअप वाहनाने ट्रॅक्टरला धडक दिली.
या धडकेत सोनावणे हे जागीच ठार झाले. जळगाव खुर्द येथे चाळीसगावकडून येणाऱ्या मालवाहू पिकअपने ट्रॅक्टरला पाठीमागून जोरदार धडक दिली. याप्रकरणी अज्ञात पिकअप चालकाविरोधात नांदगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील चाकण, नारायणगाव परिसरामध्ये सध्या उन्हाळी कांदा काढण्याचे काम सुरु झाले आहे. कांदा काढणीच्या कामासाठी मध्यप्रदेश राज्यातील सेंधवा येथून चार क्रुझर गाड्यांमध्ये शेत मजूर हे लासलगाव मार्गे नारायणगाव येथे चालले होते. एका क्रूजर गाडी समोर अचानक सायकलस्वार आल्याने सायकलस्वारला वाचवायच्या नादात क्रुझर गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यांमध्ये पलटी झाली. या अपघातात 10 जण जखमी झाले. यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. गंभीर जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.