नाशिक : पोलिसांनी न जाण्याची विनंती करूनही मातोश्रीवर (Matoshree) जाण्याचा अट्टाहास का, असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी मातोश्रीबाहेर घडलेल्या प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे. गुन्हे अन्वेषण प्रशिक्षण विद्यालयाच्या उद्घाटन सोहळ्याच्या कार्यक्रमावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर त्यांनी आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले, की ज्यातून नवीन प्रश्न निर्माण होणार आहेत. कायदा सुव्यवस्था (Law & Order) निर्माण होण्याचा प्रश्न होणार आहे, त्या गोष्टी टाळायला हव्यात. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनाही पोलिसांनी मातोश्रीवर जाऊ नये असे सांगितले होते, मात्र त्यांनी ऐकले नाही, शेवटी जे व्हायला नको होते ते झाले, अशी नाराजी अजित पवार यांनी यावेळी बोलून दाखवली.
ज्यांना काही प्रार्थना करायची आहे, त्यांनी ती घरी करावी किंवा मंदिरात जाऊन करावी. त्यांना अनेकवेळा पोलिसांनी सांगितले तरी ते आले. शेवटी शिवसैनिक आक्रमक झाले. जे व्हायला नको होते, ते झाले. पोलिसांनी त्यांना विनंती करून त्यांना न येण्याचे आवाहन केले. मात्र तरी ते आले. त्यामुळे शिवसैनिकांच्या भावना तीव्र झाल्या. ज्यावेळेस एखादा जमाव प्रक्षुब्ध असतो, तिथे जाणे योग्य नाही, असे अजित पवार म्हणाले.
प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागायला हवे. राज्यकारभार करत असताना सगळीकडे शांतताच राहायला हवी, कोणालाही त्रास होता कामा नये, ही भावना आहे. तपास यंत्रणा म्हणूनच पोलिसांचे काम आहे. ते त्यांचे काम करतील. केंद्राची सुरक्षा असो, नसो. कोणावरही हल्ला होता कामा नये. आपण पण कोणालाही उचकावण्याचा प्रयत्न करू नये. दुसऱ्यावर राग काढण्याचे कारण काय, असा सवाल त्यांनी केला.
राजकीय हस्तक्षेपाला बळी पडू नका. राजकीय हस्तक्षेप कुणीही करू नये. सगळ्यांनी आपापली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली, तर असे प्रश्न निर्माण होणारच नाहीत. आपण कारभार करत असताना राज्य उत्तम पद्धतीने पुढे जावे, हीच शिकवण पवार साहेबांची आहे, असे ते म्हणाले.