चंदन पूजाधिकारी, टीव्ही 9 मराठी, नाशिक | 8 डिसेंबर 2023 : गेल्यावर्षी 8 ऑक्टोबर 2022च्या पहाटे छत्रपती संभाजीनगरवरून नाशिकच्या दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या एका खाजगी बसला अपघात होऊन अचानक आग लागल्याने होरपळून 12 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ नाशिकच्या नांदूरनाका परिसरातील या चौफुलीवर पाहणी केली आणि तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. या परिसरात आणि खास करून या चौफुलीवर सातत्याने होणारे अपघात आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या भागात दोन उड्डाणपूल तयार करण्याची मागणी आमदार राहुल ढिकले यांनी प्रशासनाकडे केली होती. विशेष म्हणजे हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नांदूर नाका परिसरातील या दोन्ही उड्डाणपुलांना राज्य सरकारने हिरवा कंदील दिला आहे.
नाशिकच्या नांदूरनाका परिसरातील चौफूलीवर वारंवार वाहन अपघात होत असतात. याच ठिकाणी गेल्यावर्षी पहाटे 8 ऑक्टोबर 2022 च्या पहाटे एका खाजगी बसचा अपघात होऊन तिला लागलेल्या आगीत होरपळून 12 प्रवाशांचा दुर्देवी मृत्यू झाला होता. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाशिकच्या नांदूरनाका परिसरातील चौफूलीवर पाहणी करून तात्काळ उपाययोजना करा असे प्रशासनाला आदेश दिले होते. या प्रकरणात नाशिक पूर्व मतदार संघाचे भाजप आमदार राहुल ढिकले यांनी या ठिकाणी दोन उड्डाण पुल उभारण्याची मागणी केली होती.
हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाच्या पहिल्याच दिवशी नाशिकच्या नांदूरनाका परिसरातील या दोन्ही उड्डाणपुलांना राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. सुमारे 50 कोटी रुपयांच्या या प्रस्तावांना मंजुरी मिळाली आहे. या उड्डाणपुलाच्या कामाला देखील लगेच सुरुवात करणार असल्याचे आमदार राहुल ढिकले यांनी स्पष्ट केल आहे. या दोन उड्डाणपूलांमुळे नांदूर नाका, मिरची चौक, तपोवन रोड या भागातील वाहतूक कोंडी तर सुटणार आहेच, मात्र यासोबत सातत्याने या चौफुलीवर होणारे अपघात देखील आता टळणार आहेत. विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर वरून येणाऱ्या खाजगी वाहनांना देखील हा उड्डाणपूल अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. नांदूर नाका परिसर हा कार्यालय आणि लॉन्सचा परिसर समजला जातो. त्यामुळे या परिसरात दररोज लग्न सोहळ्यासाठी येणाऱ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळेच या परिसरात सातत्याने वाहतूक कोंडी आणि छोटे मोठे अपघात देखील होत असतात. मात्र आमदार ढिकले यांच्या पुढाकारांना होणाऱ्या या उड्डाणपणामुळे येत्या काळात वाहतूक कोंडी दूर होऊन या अपघातांना आळा बसणार आहे.