नाशिक : अतिक अहमदच्या गुन्ह्याचा शनिवारी द एन्ड झाला आहे. प्रयागराजच्या कॉल्विन हॉस्पिटलला जात असताना अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळी घालून हत्या करण्यात आली. कॉल्विन हॉस्पिटलमधून निघत असताना तीन हल्लेखोरांना या दोन्ही भावांवर अंधाधूंद गोळीबार केला. त्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू झाला. या तिन्ही हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. या आधी पोलिसांनी असद याचं एन्काऊंटर केलं होतं. असद प्रकरणाचे धागेदोरे नाशिकमध्ये असल्याने अतिक आणि अशरफच्या हत्येनंतर दिल्लीच्या एसटीएफ पथक नाशिकमध्ये आलं. या पथकाने नाशिकमधून एकाला ताब्यात घेतल्याने खळबळ उडाली आहे.
असद एन्काऊंटर प्रकरणाचे धागेदोरे नाशिकमध्ये असल्याचं उघड झालं आहे. त्याचाच एक भाग म्हणून अतिक आणि अशरफ यांच्या हत्येनंतर STF पोलिसांचे एक पथक नाशिकमध्ये दाखल झालं आहे. दिल्ली पोलिसांनी नाशिकमधून एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. दिल्ली पोलीस आणि नाशिक पोलिसांनी ही एकत्रित कारवाई केली. संशयित इसम असदच्या नेटवर्कमधील लोकांच्या संपर्कात असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यामुळे पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेतल्याचं सांगितलं जात आहे.
नाशिकच्या पाथर्डी परिसरातून संशयित इसमाला ताब्यात घेतलं आहे. STF च्या पथकाकडून संशयिताची वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात येणार आहे. असद आणि गुड्डू मुस्लिम प्रकरणात आणखी काही धागे दोरे मिळण्याची शक्यता पोलिसांना असल्यानेच या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात आली आहे. मात्र, पाथर्डीतून एकाला ताब्यात घेण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाथर्डीतील ग्रामस्थही या प्रकारामुळे हादररून गेले आहेत.
दरम्यान, प्रयागराजमध्ये ज्यांनी अतिक अहमद आणि अशरफ अहमद यांची हत्या केली त्या तिघांची कसून चौकशी केली जात आहे. या तिघांनी तीन दिवसांपासून रेकी केली होती. तिघांचं कालचं आणि परवाचं लोकेशन प्रयागराजच होतं. तिघे हल्लेखोर प्रयागराज जनपदचे नाहीत. काही दिवसांपासून हे तिघे प्रयागराजमध्ये तळ ठोकून होते, असं सांगितलं जातं.