एकाचवेळी निवडणूक घ्या, निवडणूक आयोगाला विचार करावाच लागेल: बाळासाहेब थोरात

| Updated on: Dec 17, 2021 | 11:10 AM

ओबीसींच्या आरक्षणासह निवडणूक झाली पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे. एकाचवेळी निवडणूक घ्यावी हा सर्वच राजकीय पक्षांचा आग्रह आहे.

एकाचवेळी निवडणूक घ्या, निवडणूक आयोगाला विचार करावाच लागेल: बाळासाहेब थोरात
balasaheb thorat
Follow us on

नाशिक: ओबीसींच्या आरक्षणासह निवडणूक झाली पाहिजे ही सर्वांची इच्छा आहे. एकाचवेळी निवडणूक घ्यावी हा सर्वच राजकीय पक्षांचा आग्रह आहे. त्यामुळे आम्हाला त्याचा विचार करावा लागेल. निवडणूक आयोगालाही त्याचा विचार करावाच लागेल, अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली.

बाळासाहेब थोरात यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसींना आरक्षण मिळवून देण्यासाठी कोर्टात जे जे करता येईल. ते आम्ही केलं. राज्य सरकार कुठेही कमी पडले नाही. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिली आहे. त्यामुळे आम्ही निवडणूक आयोगाला निवडणूक थांबवण्याची विनंती केली आहे. सगळ्या निवडणुका एकत्रच घ्या हा आमचा आग्रह आहे. पण आयोग थांबणार नसेल तर आमचे उमेदवार तयार आहेत. उघड्यावर थोडीच सोडता येणार आहे. म्हणून आम्ही प्रचाराला लागलो आहोत, असं थोरात म्हणाले.

टाटा, एमकेसीएलला काम द्या

यावेळी त्यांनी भरती प्रकरणावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. भरती प्रकरणात दोषी असतील त्याला शिक्षा होईल. पुन्हा असे घोटाळे होऊ नये म्हणून टाटा, एमकेसीएल सारख्या संस्थाना काम दिलं पाहिजे. या संस्थांनी चांगलं काम केलं आहे. त्यांच्यावर जबाबदारी टाकावी असं आमचं मत आहे. पाच वर्षापूर्वीच हे पॅनल तयार झालं आहे. या पूर्वीही त्यांनी काम केलं आहे, असं त्यांनी सांगितलं. या संस्थांना आमचं ऑब्जेक्शन आहे. पण उच्च दर्जाच्या संस्था घ्यायला हव्यात. पैसा लागला तरी चालेल. पण पारदर्शकता असावी. पॅनलवरच्या कंपन्या असतात. त्या विश्वासहार्य असतात. मंत्र्यांना सर्वच गोष्टी पाहता येत नाही, असंही त्यांनी सांगितलं.

सर्वांना योग्य निधी मिळतो

काँग्रेसच्या मंत्र्यांना निधी कमी दिला जात आहे, अशी चर्चा आहे. त्याबाबत विचारले असता, असं काही नाही. सर्वांना निधी मिळतो. निरनिराळे विभाग आहेत. त्या खात्यानुसार निधी मिळतो. काँग्रेसला योग्य निधी मिळत आहे, असं त्यांनी सांगितलं.

चव्हाण योग्यच बोलले

आमच्यावर सरकार अवलंबून आहे, असं अशोक चव्हाण म्हणाले होते. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. अशोक चव्हाण चुकीचं बोलले नाही. तीन घटक पक्ष आहेत. प्रत्येकाचं महत्त्व आहे. आमचंही महत्त्व आहे. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. आमचं अस्तित्व तुम्ही पाहत आहात. आम्ही पंचायत समितीत नंबर वन आहोत. आमची संख्या कमी म्हणून आम्ही तिसऱ्या नंबरवर आहोत. आमचे मंत्री चांगलं काम करत आहेत, असं ते म्हणाले.

 

संबंधित बातम्या:

अश्लील व्हिडीओ कॉल करुन ब्लॅकमेल, शिवसेना आमदार प्रकाश सुर्वेंची पोलिसात तक्रार

Aurangabad: औरंगाबाद ते वाळूज अखंड उड्डाण पुलाचा प्रस्ताव पुढे सरकतोय, डॉ. कराड यांचे नितीन गडकरींना निवेदन

हम तो शेर पर एहसान किया करते है, चुहे पर नही.. जळगावात नाथाभाऊंचा शेर आणि उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट