नाशिक : बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी शिवसेना ठाकरे गटाची सभा पार पडली. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार भाषण करत भाजपवर आसुड ओढलं. ठाकरेंची तोफ धडाडण्याआधी फायरब्रँड नेते भास्कर जाधव यांनी भावनिक भाषण केलं होतं. विश्वासघात झालाय, आपल्या पक्षप्रमुखाला गादीवरून खाली ओढलंय. आता बाहेर पडायची वेळ आलीये असं म्हणत भास्कर जाधवांनी रश्मी ठाकरेंना साद घातली.
उद्धव ठाकरे यांना आवडणार नाही पण आज मी रश्मी ठाकरेंवर भाषण करणार आहे. गेले अनेक दिवस आपल्या माणसांवर अन्याय होत आहे. मात्र या सगळ्यात रश्मी ठाकरे या जराही डगमगल्या नाहीत ना त्यांचा तोल ढळला नाही. याआधी शिवसेनेच्या सभांमध्ये व्यासपीठावर एका बाजूला बाळासाहेबांच्या रूपाने धगधगतं अग्निकुंड असायचं तर दुसऱ्या बाजूला चंद्राप्रमाणे शांत माँसाहेब बसलेल्या असायच्या. उद्धव ठाकरे यांचं मुख्यमंत्रिपद गेलं, आदित्य ठाकरेंवर आरोप झाले तरीही मी त्यांना डगमगलेलं पाहिलं नाही. अनेक संकट आलीत पण माँसाहेबांसारख्याच रश्मी ठाकरे लढत राहिल्या असल्याचं भास्कर जाधव म्हणाले. यावेळी रश्मी ठाकरेसुद्धा भावुक झालेल्या पाहायला मिळालं.
हिंदू धर्माचा सर्वात जास्त अपमान या केंद्र सरकारने केला. शंकराचार्य यांचं योगदान काय, असा प्रश्न विचारला जातो. लघू, सूक्ष्म आणि मध्यम मंत्री असा प्रश्न विचारत आहे? आपण पिसे काढली. तो बामलाव्या (रामदास कदम) आज अजित पवार यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचं म्हणत भास्कर जाधव यांनी नारायण राणे आणि कदम यांच्यावर निशाणा साधला.
दरम्यान, काँग्रेसच्या नेत्याने आदित्य ठाकरे यांना सांगितलं, की या चाळीस कुत्र्यांनी तुमच्या वडिलांना घेरलं आणि तुम्ही लढला म्हणून तुम्ही मला आवडता. पत्रकार मला विचारत आहेत की तेजस ठाकरे आरतीला बसले होते. ते कधी राजकारणात उतरणार आहेत. यावर त्यांच्या राजकारणातील प्रवेशाबाबत मला माहिती नाही पण त्यांना जेव्हा वाटेल त्यावेळी ते गरूड झेप घेतील. कारण तो वाघाचा बछडा असल्याचं भास्कर जाधव म्हणाले.