नाशिकः शरद पवारांनी (Sharad Pawar) जातीयवादाला खतपाणी घातले, असा आरोप आतापर्यंत कुणीही केला नाही. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Narendra Modi) देखील पवारांचा हात धरून राजकारण शिकलो असे सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर असे आरोप करण्यात अर्थ नाही, म्हणत पालकमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मंगळवारी उत्तर दिले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणीस यांनी पवारांवर असे आरोप केले होते. त्याला भुजबळांनी आपल्या शैलीत उत्तर दिले. भुजबळ यांनी यावेळी राज ठाकरेच्या सभेवर टिपण्णी केली. ते म्हणाले, पोलिसांचे म्हणणे जागेसंदर्भात आहे. सुरक्षा आणि गर्दीच्या दृष्टीने त्यांनी विचार केला असेल. मनसेचे तिथले नेते आणि प्रशासन चर्चा करून तो प्रश्न सोडवतील. केंद्राने नवनीत राणा प्रकरणावर अहवाल मागवला असेल, तर 24 काय 12 तासात देऊ असे उत्तर त्यांनी दिले. किरीट सोमय्या यांचे करमणुकीचे कार्यक्रम असतात म्हणत त्यावर बोलणे टाळले.
कृषी टर्मिनल उभे राहणार
छगन भुजबळ म्हणाले की, जिल्ह्यातले प्रश्न मार्गी लावण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांसह सर्वच विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अंजनेरी ट्रेकिंग इन्स्टिट्यूट उभारणीसाठी 1 कोटी 60 लाख रुपये मिळणार आहेत. इन्स्टिट्यूटची आवश्यक कामे मार्गी लावण्याच्या संबंधित विभागांना सूचना दिल्यात. पिंपरी सय्यदच्या कृषी टर्मिनलच्या आरक्षणाचा विषय मार्गी लावून पाठपुरावा करणार, पीपीपी तत्वावर कृषी टर्मिनल उभे राहणार आहे. नाशिक विमानतळावर महापालिकेची बस सुविधा सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
पाणीपुरवठा योजनेसाठी सूचना…
भुजबळ म्हणाले की, भावली धरणावरील आदिवासी क्रीडा प्रबोधनीच्या कामाच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेच्या सूचना दिल्या आहेत. मुंढेगावच्या दादासाहेब फाळके चित्र सृष्टीचे काम लवकरात लवकर मार्गी लावणार आहोत. मांगीतुंगीसाठी 254 कोटी मागच्या सरकारने मंजूर केले होते. मात्र, त्याची कागदपत्रे वगैरे नाहीत. आता तिथे ताबडतोब सोयी सुविधा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. लासलगाव – विंचूर 16 गाव पाणीपुरवठा योजना ताबडतोब कार्यान्वित करण्याच्या सूचना दिल्याचेही त्यांनी सांगितले.
शरद पवारांनी जातीयवादाला खतपाणी घातले, असा आरोप आतापर्यंत कुणीही केला नाही. स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील पवारांचा हात धरून राजकारण शिकलो असे सांगितले. त्यामुळे त्यांच्यावर असे आरोप करण्यात अर्थ नाही. केंद्राने नवनीत राणा प्रकरणावर अहवाल मागवला असेल, तर 24 काय 12 तासात देऊ.
– छगन भुजबळ, पालकमंत्री