नंदूरबार : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठीचा प्रचार संपायला अवघे दोन दिवस उरले आहेत. परंतु, अजूनही अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपने पाठिंबा दिलेला नाही. त्यामुळे या निवडणुकीचं सस्पेन्स वाढला आहे. भाजप तांबे यांना पाठिंबा देईल असं सांगितलं जात असतानाच भाजपमधूनच आता तांबे यांना पाठिंबा देण्यास जोरदार विरोध होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फोटोला काळे फासणाऱ्या व्यक्तीला पाठिंबा का म्हणून द्यायचा? असा सवाल करत भाजपच्या एका गटाने तांबे यांना विरोध करत जोरदार निदर्शनेही केली आहेत. त्यामुळे तांबे यांची अवस्था ना घर का ना घाट का अशी होण्याची चिन्हे दिसत आहेत.
महागाईविरोधातील आंदोलनात सत्यजित तांबे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पोस्टरला काळे फासले होते. ज्या उमेदवाराला देशाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या नेत्याचा सन्मान करता येत नाही, त्याला भाजपने पाठिंबा देऊ नये. भाजपने पाठिंबा दिला तरी सुज्ञ नागरिक आणि पक्षाचे कार्यकर्ते सत्यजित तांबे यांना मतदान करणार नाहीत, असा इशारा नंदूरबारमधील भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.
नंदूरबामधील भाजपचे पदाधिकारी केवळ इशारा देऊनच थांबले नाहीत तर त्यांनी सत्यजित तांबे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन केले. भाजपच्या माजी नगरसेविकेचे पुत्र लक्ष्मण माळी यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं आहे. शेकडो तरुणांनी या आंदोलनात भाग घेतला होता. यावेळी सत्यजित तांबेंविरोधात जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
यावेळी आंदोलकांच्या हातात एक बॅनर होते. त्यावर सत्यजित तांबे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या बॅनरला काळे फासताना दिसत आहेत. भाजपच्या एका गटाच्या या अनोख्या आंदोलनामुळे भाजपची डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे सत्यजित तांबे यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
पदवीधर मतदारसंघाचा प्रचार संपायला दोन दिवस बाकी आहेत. मात्र, अजूनही भाजपने सत्यजित तांबे यांना पाठिंबा दर्शविलेला नाही. त्यातच दुसरीकडे भाजपच्या एका गटाकडून तांबे यांना विरोध होत असल्याने तांबे यांना फटका बसणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. पक्षाने आदेश दिला तरी सत्यजित तांबे यांच्या मागे उभे राहणार नाही, असा इशाराच नंदूरबारमधील भाजप कार्यकर्त्यांनी पक्ष नेतृत्वाला दिल्याचं या निमित्ताने सांगितलं जात आहे.