नाशिक : कधी नव्हे ती घटना नाशिकच्या (Nashik) लष्कर हद्दीत घडल्याचे समोर आले आहे. नव्याने नाशिकमध्ये स्थापन झालेल्या सीबीआय (CBI) पथकाने नाशिक येथील लष्कर विभागात मोठी कारवाई केली आहे. लष्कर हद्दीत कंत्राटदाराकडून लाच घेतांना दोघांना रंगेहाथ सीबीआयच्या पथकाने पकडले आहे. नाशिकच्या अत्यंत सुरक्षित असलेल्या लष्कर हद्दीत ही कारवाई करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. लष्कर हद्दीतही भ्रष्टाचाराची कीड पसरली गेलीय का ? असा सवाल उपस्थित करत चर्चेला उधाण आले आहे. अत्यंत सुरक्षित असलेल्या परिसरात कॉम्बॅक्ट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूल च्या आवारात परिसरात ही घटना घडली आहे. एका कंत्राटदाराकडून एक लाख वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. त्यामध्ये मेजर हिमांशू मिश्रा कनिष्ठ अभियंता मिलिंद वाडीले यांनी ही रक्कम मागितली होती. हीच रक्कम गुरुवारी संध्याकाळी उशिरा कॅटच्या आवारात स्वीकारत असताना सीबीआय पथकाने छापा टाकला आणि दोघांना लाच घेतांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये नाशिकच्या विविध विभागात लाच घेतांना रंगेहात पकडण्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला यश येत आहे.
नुकतेच लाच घेतांना मनपा प्रशासनातील दोन कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले होते, तर पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत कारवाया केल्या आहे.
हिमांशू मिश्रा हे मेजर असून त्यांच्याकडे सहाय्यक गिअर्सन इंजिनियर या पदावर आहेत तर त्याच विभागात मिलिंद वाडीले कनिष्ठ अभियंता म्हणून काम पाहत आहे.
याच विभागातील एका टेंडर मंजूर करण्याकरिता मिश्रा आणि वाडिले यांनी एक लाख वीस हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती, याची माहिती सीबीआयचे पोलीस निरीक्षक रंजीत पांडे यांना मिळाली होती.
रंजीत पांडे यांच्या पथकाने संबंधित कंत्राटदाराच्या माहितीनुसार सापळा रचला होता. त्यानुसार लष्कर हद्दीत ही कारवाई करत पांडे यांचा सापळा यशस्वी झाला आहे.
एकूणच या कारवाईने नाशिकसह संपूर्ण लष्कर विभागात खळबळ उडाली असून भ्रष्टाचाराचे लोन आता लष्करी आस्थापनापर्यन्त पोहचल्याचे बोलले जात आहे.
त्यामुळे वेळीच ही भराष्ट्राचाराची कीड मारण्याची गरज असल्याची चर्चा जनमानसात होऊ लागली असून सीबीआयने केलेल्या या कारवाईचे स्वागत होत आहे.