नाशिक : देवीच्या साडेतीन पीठांपैकी अर्ध पीठ असलेल्या नाशिकच्या (Nashik) सप्तशृंग गडावर (Saptashrungi gad) रामनवमीपासून (Ram navmi) उत्सव सुरू होत आहे. हा चैत्रोत्सव असेल. या चैत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्ट व स्थानिक ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाच्या वतीने यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण तयारीला वेग आला आहे. मंदिर ट्रस्टच्यावतीने साफसफाई तसेच दुरुस्तीचे कामे हाती घेण्यात आली आहे. तर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर भविकांवर असणार आहे. घाट रस्त्यावर संरक्षण कठड्यांना रंगविण्यात येत आहे. राज्य शासनाने राज्यात कोरोना निर्बंध उठविल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. खांदेशातून मोठ्या प्रमाणावर भाविक चैत्रोत्सवासाठी गडावर पायी दर्शनासाठी येत असतात. यात्रेच्या काळात मंदिर भाविकांसाठी 24 तास खुले राहणार आहे. यात्रेनिमित्त सोमवारी जिल्हा प्रशासनाच्या वतीने आढावा बैठकही घेण्यात येणार आहे.
चैत्रोत्सवास चैत्र शुध्द म्हणजेच एप्रिल महिन्यात रामनवमीपासून गडावर प्रारंभ होतो. हा उत्सव साधारणत: दहा ते बारा दिवस सुरू राहतो. या उत्सवात आईचे माहेर म्हणवल्या जाणार्या खांदेशातून लाखो संख्येने भाविक गडावर पायी येतात. अडीशे किलोमीटर पायी प्रवास करून आईच्या दर्शनास येणार्या या भाविकांची मिलन सोहळा पाहण्यासारखा असतो.
या उत्सवात चावदसच्या (खांदेशातील भाविक चतुर्दशीला चावदस असे म्हणतात) दिवशी खांदेशवासी मोठ्या संख्येने आईचे दर्शन घेतात व दुसर्या दिवशी असणार्या पैार्णिमेस घराकडे परततात. गडावर चैत्र उत्सवास चार ते पाच लाख भाविक दर्शनास येतात.