नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शेतकरी वेगवेगळ्या कारणामुळे संकटात सापडला आहे. त्यातच झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे.काल सटाणा भागात पाऊस झाल्यामुळेही शेतीचे नुकसान झाले तर शहर परिसरातही झालेल्या पावसामुळे नागरिकांना त्याचा फटका बसला आहे. अवकाळी पावसामुळे द्राक्ष, गहू, हरभरा या पिकांचे मोठं नुकसान झाले आहे. एकीकडे अवकाळी पावसामुळे शेतकरी बेजार झाला आहे तर दुसरीकडे बाजारभावामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे.
त्यामुळे बिचाऱ्या शेतकऱ्यांनी करावं तरी काय ? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी उपस्थित केला आहे.
सध्याच्या काळात शेतकरी चहूबाजूंनी अडचणीत सापडला आहे.एकीकडे अवकाळी पावसाचे संकट, तर दुसरीकडे आलेल्या पिकाला योग्य बाजारभाव मिळत नाही.
त्यामुळे अशा परिस्थितीत फक्त सरकारच शेतकऱ्यांना मदत करू शकते. 10 लाख कोटी रुपये उद्योगपतींना जर सरकार माफ करत असेल तर या शेतकऱ्यांकडेदेखील सरकारने लक्ष दिले पाहिजे असं स्पष्ट मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले आहे.
त्यामुळे सरकारने पहिल्यांदा शेतकऱ्यांना महत्व दिले पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले. शेतकरी संकटात सापडले असले तरी पीक विमावाले शेतकऱ्यांना कोणतीही मदत करत नाही. शब्दच्छंल करून शेतकऱ्यांना विम्याचे संरक्षण देण्यात येत नाही.
तर त्यामुळे ताबडतोब पंचनामे करून त्यांची माहिती सरकारकडे जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवली पाहिजे असंही छगन भुजबळ यांनी सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांची चारीबाजूनी कोंडी झाल्याने शेतकऱ्यांच्या आयुष्याचीच होळी व्हायला आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितले.
त्र्यंबकेश्वर महिलेच्या प्रसूतीचे प्रकरण ताजे असल्यामुळे त्याच्यावरही छगन भुजबळ यांनी निशाणा साधला. त्याबाबतीत आपण जिल्हाधिकाऱ्यांबरोबर बोललो असून फक्त अत्याधुनिकतेचे दवाखाने फक्त मुंबईत काढून चालणार नाही तर ग्रामीण भागात पण चांगले दवाखाने आणि तज्ज्ञ डॉक्टर आले पाहिजे असंही त्यांनी सरकारला बोलून दाखवले आहे.