नाशिक : राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांचा ७५ वा वाढदिवस साजरा होत आहे. मुंबईतील (Mumbai) माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात हा सोहळा होणार आहे. ७५ व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या अध्यक्षतेखाली ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छगन भुजबळ यांच्या जीवनावर आधारित पुस्तकाचे होणार प्रकाशन देखील होणार आहे. १५ ऑक्टोबर ही छगन भुजबळ यांची जन्मतिथी असली तरी 13 ऑक्टोबरला षण्मुखानंद सभागृहात येथे ‘अमृत महोत्सव’ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. पण याच दरम्यान दिग्गज राजकारण्यासोबत विविध क्षेत्रातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे.
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याबरोबत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे,केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले,
जम्मू अँड काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष डॉ.फारुख अब्दुल्ला, प्रज्ञावंत लेखक-कवी डॉ.जावेद अख्तर,
विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. निमंत्रण पत्रिकेत यांचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.
धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर ठाकरे गटाला मशाल चिन्ह मिळाले आहे. त्यावरुन ठाकरे गटाच्या केसरकर यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जहरी टीका केली होती.
बाळासाहेबांना सोडून गेलेल्या आणि बाळासाहेबांच्या अटकेची शपथ घेतलेल्या भुजबळांच्या मांडीला मांडी लावून बसता त्यांचेच चिन्ह तुम्हाला मिळाल्याचे केसरकर म्हणाले होते.
छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाहीर करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत देखील शिवसेना प्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांचा फोटोसहित उल्लेख करण्यात आला आहे.
शिवसेना नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर उद्धव ठाकरे पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे यामधून दिसून येत आहे.
मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर उदधव ठाकरे यांनी जाहीर कार्यक्रमात हजेरी लावणं टाळलं होतं, मात्र भुजबळ यांच्या वाढदिवसांच्या निमंत्रण पत्रिकेत नाव असल्याने ठाकरे यांच्या उपस्थितीबद्दल चर्चा सुरू झाली आहे.
त्यामुळे माटुंगा येथे होत असलेल्या भुजबळांच्या अमृत महोत्सव सोहळ्याला उद्धव ठाकरे उपस्थित राहतात का ? याकडे अनेकांच्या नजरा लागून आहेत.