जरांगेंचा अभ्यास कमी, उगीच काही…; छगन भुजबळांनी पुन्हा मनोज जरांगेंना डिवचलं

| Updated on: Jun 24, 2024 | 1:10 PM

Chhagan Bhujbal on Manoj Jarange Paril and Maratha Reservation : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांना पुन्हा एकदा डिवचलं आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरही त्यांनी भाष्य केलं आहे. छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

जरांगेंचा अभ्यास कमी, उगीच  काही...; छगन भुजबळांनी पुन्हा मनोज जरांगेंना डिवचलं
छगन भुजबळ, मनोज जरांगे पाटील
Follow us on

मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सध्या ऐरणीवर आला आहे. अशातच मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी नेते छगन भुजबळ यांच्यात शाब्दिक वार सुरु आहेत. छगन भुजबळ यांनी आज नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्यावर त्यांनी निशाणा साधला आहे. ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही लढत आहोत. 25 वर्षांपूर्वी मुस्लीम समाजातील काही घटकांना आरक्षण दिलेलं आहे. मनोज जरांगेचा अभ्यास कमी आहे. उगीच माहीत काही नसतंय बोलायचं म्हणून उगी बोलायचं. कधी मुस्लिमांना तर कधी धनगर समाजाबद्दल खुश करण्यासाठी बोलायचं, असं छगन भुजबळ म्हणाले.

इम्पीरिकल डेटा भुजबळ काय म्हणाले?

भाजपने इम्पीरिकल डेटा दिला नाही असं नाही. जेटली होते की, म्हणाले ओबीसी समाजाला मदत करायची गरज आहे. 1991 पासून समता परिषदेची मागणी होती. 2016 साली माहिती गोळा झाली. मात्र पुढे आकडेवारी जाहीर झालेली नाही. आमचं म्हणणं आहे की सेन्सर्स कमिशन कडून ती माहिती गोळा केली पाहिजे. कारण त्यांच्याकडून जेव्हा माहिती गोळा होते, त्यात चुकीची माहिती कुणी दिली तर त्याला शिक्षा आहे. रखडलेल्या दशवर्ष जनगणनेत जात गणना करा, ही आमची मागणी असल्याचं छगन भुजबळ यांनी सांगितलं.

शिक्षकमतदारसंघाच्या निवडणुकीवर काय म्हणाले?

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत साड्यांचं वाटप झाल्याचा आरोप करण्यात आलाय. यावर मी वर्तमान पत्रातून वाचलं. मागच्या वेळी 200- 400 रुपयांचा पैठण्या वाटल्या. फसवेगिरी आहे. फसवेगिरीला कुणीही बळी पडू नये. शिक्षकांकडून अशी अपेक्षा नाही, त्यांना आपण गुरुवर्य म्हणतो. शिक्षकांनी सत्सदविवेक बुद्धीने मतदान करावं, असं छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

आमदारांच्या निधी वाटपावरही छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अजून कुणालाही ही काही मिळाले नाही. विकासकांसाठी पैसे मिळतात उगाच मोठ्या प्रमाणात दान मिळणार अशा चर्चा सुरू आहे. आचारसंहितेमुळे सर्व निर्णय पेंडिग आहेत, असं भुजबळ म्हणालेत.

राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होतेय. यावर छगन भुजबळ यांनी भाष्य केलं आहे. मंत्रिमंडळ विस्तार बाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. मला काहीच अपेक्षा नाही. खात अपडेट वगैरे काही नाही. मला फक्त लोकांची काम करायची आहेत, असं भुजबळांनी सांगितलं आहे.