नाशिक: छत्रपती शिवाजी महाराज (shivaji maharaj) यांची समाधी लोकमान्य टिळकांनी बांधल्याचं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं होतं. राज ठाकरे यांचं हे विधान राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (chhagan bhujbal) यांनी खोडून काढलं आहे. राज ठाकरे महाराष्ट्राचा खोटा इतिहास मांडत आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शंभू राजेंनी बांधली. महात्मा फुले यांनी महाराजांची समाधी शोधली. टिळकांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी बांधली, हे धादांत खोटं आहे. ज्या वेळी फुलेंनी समाधी शोधली, त्यावेळी टिळक केवळ 13 वर्षांचे होते, असं छगन भुजबळांनी सांगितलं. टिळकांनी शिवस्मारकासाठी केवळ फंड गोळा केला. मात्र उभ्या आयुष्यात काहीच केलं नाही. पुढे विचारणा झाल्यावर ज्या बँकेत फंड ठेवला होता, ती बँकच बुडाली असं सांगण्यात आलं, असा दावाही भुजबळ यांनी केला आहे. भुजबळांनी राज ठाकरे यांनी सांगितलेल्या इतिहासाचा पंचनामाच केल्याने आता राज ठाकरे त्यावर काय उत्तर देतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना ही टीका केली. महात्मा फुले यांनी मुलींची पहिली शाळा भिडे यांच्या वाड्यात सुरू केली. संभाजी भिडे यांनी आयुष्यभर मुस्लिमांचा द्वेष केला. पण त्याच भिडे यांची शस्त्रक्रिया मुस्लिम डॉक्टरने केली, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
राज ठाकरे यांनी कालच्या सभेत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर टीका केली. त्यांनी पवार जातीयवादी असल्याचा पुनरुच्चारही केला. त्यावरही भुजबळांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. शरद पवारांना जातीयवादी ठरवण्यासाठीच काल राज ठाकरेंची सभा होती की काय असं वाटत होतं, अशी टीका करतानाच तुम्ही फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव का घेत नाही? असा सवाल भुजबळांनी केला.
राज ठाकरे यांनी काल औरंगाबादेत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगितला. शरद पवारांनी तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं वाचू नये. राष्ट्रवादीच्या जन्मानंतर दुसऱ्या जातीचा द्वेष सुरू झाला. मराठा समाजाची माथी भडकवली गेली. जेम्स लेन सारखा माणूस उभा करायचा त्याने काही लिहिल्यावर त्यावरून माथी भडकवायची. ज्या माणसाने शिवाजी महाराज घराघरात पोहोचवले. त्या बाबासाहेब पुरंदरेंना वृद्धापकाळात पवारांनी त्रास दिला. कशासाठी तर ते ब्राह्मण म्हणून. आम्ही जात मानत नाही. बघितली नाही. त्याच्याशी घेणं देणं नाही. मी व्यक्ती बघतो. जात बघून पुस्तकंही वाचत नाही. रायगडावरील समाधी कुणी बांधली? ती लोकमान्य टिळकांनी बांधली. त्यांना काय तुम्ही ब्राह्मण म्हणून पााहणार का? टिळकांच्या पहिल्या वर्तमान पत्राचं नाव काय मराठा. हे पवार साहेब कधी सांगणार नाही, असा हल्लाबोल राज ठाकरे यांनी केला होता.