भंडारदरा: भारताला 1947मध्ये भीक म्हणून स्वातंत्र्य मिळालं आहे. देशाला खरं स्वातंत्र्य 2014मध्ये मिळालं, या अभिनेत्री कंगना रणावतच्या विधानाची राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी खिल्ली उडवली आहे. 2014नंतर देशाला काय मिळालं? पेट्रोल महंगा… गॅस महंगा… असं म्हणत छगन भुजबळांनी कंगनाच्या विधानाची खिल्ली उडवली.
इगतपुरी तालुक्यातील सोनोशी येथे येथे क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मरणार्थ सन्मान बाडगीच्या माचीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित होते. यावेळी छगन भुजबळ बोलत होते. काही लोक म्हणतात 1947 ला मिळालेलं स्वतंत्र म्हणजे भीक आहे. 2014 नंतर काय मिळालं? पेट्रोल महंगा… गॅस महंगा…, अशी खिल्ली उडवतानाच ज्यांना देशाचा इतिहास माहीत नाही. त्यांना पुरस्कार दिला जातो, असा टोला भुजबळांनी लगावला.
लाखो लोकांच्या बलिदानानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाले आहे, त्यात क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचेही योगदान अविस्मरणीय व अतुलनीय असे आहे. क्रांतीवीर राघोजी भांगरे यांच्या स्मारकाच्या रुपाने स्वातंत्र्याची ज्योत तेवत राहील. तसेच आदिवासी समाजाच्या विकासासाठी खासदार शरदचंद्र पवार यांनी वेळोवेळी निधीची तरतूद केली. आजूबाजूची जमीन डिफेन्ससाठी संपादित करण्याचा प्रयत्न झाला. त्यावेळी पवार साहे आदिवासींच्या पाठीशी उभे राहिले, असं भुजबळ म्हणाले.
प्रकृतीच्या विरोधात लढण्याची प्रेरणा आदिवासी बांधवांनी जगाला दिली. अतिशय प्रतिकूल परिस्थिती कसे रहावे याच ज्वलंत उदाहरण म्हणजे आदिवासी बांधव आहेत. आदिवासी बांधवांच्या हक्काच्या जमिनी परत मिळवून देण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचे सांगतानाच वनवासी आश्रमच्या निमित्ताने चांगलं काम चालू आहे असं चित्रं निर्माण केलं जात आहे. तुमचं आरक्षण काढण्यासाठीच तुम्हाला वनवासी म्हटलं जात आहे. तुमच्या जमिनी बळकावण्याचा प्रयत्न होत आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.
पिढ्या न् पिढ्या या देशाचा मूळ मालक असलेल्या आदिवासींची अवस्था वाईट आहे. त्यांच्या परिस्थितीत सुधारणा करण्याची गरज आहे. जल जमीन आणि पर्यवरणाचे रक्षण करण्याचे काम आदिवासी बांधावाकडून केले जात आहे. त्यांच्या सर्वांगीण उत्थानासाठी केंद्र सरकार व राज्य शासन विविध कार्यक्रम राबवत आहे, आजचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग आहे. सामाजिक परिवर्तन सामाजिक न्यायासाठी झटणाऱ्या आदिवासी बांधवांनी देशाच्या जंगल संपत्तीचे रक्षण करण्याची जबाबदारीही पार पाडली आहे. अन्यायाच्या विरोधात जे लढतात त्यांना नक्षलवादी म्हणता येणार नाही. कायदा हातात घेऊन काही लोक नक्षलवाद पसरविताना आदिवासी बांधवांना बदनाम करत आहेत, असे शरद पवार म्हणाले.
संबंधित बातम्या:
VIDEO: कंगना रणावत खरी बोलली, स्वातंत्र्य भिकेत मिळालंय; विक्रम गोखलेंकडून कंगनाचं समर्थन
शिवसेना-भाजपने एकत्रं यायला हवं, त्याशिवाय पर्यायच नाही; ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखलेंचं रोखठोक मत