इगतपुरी, नाशिक : नाशिकच्या इगतपुरीतील (Igatpuri) जिंदाल कंपनीला भीषण आग (Jindal Company Fire) लागली आहे. बॉयलरचा स्फोट होऊन ही आग लागल्याची माहिती आहे. इगतपुरीतील मुंढेगावात ही घटना घडली आहे. 14 जणांना वाचवण्यात आलं असून या घटनेत एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. आगीवेळी मोठे स्फोट झाल्याची माहिती आहे.
नाशिकच्या जिंदाल कंपनीलाा आग लागल्यानंतर यंत्रणा घटनास्थळी पोहचली आहे. आग विझवण्याचं काम सुरु आहेत. केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार आणि दादा भुसे घटनास्थळी दाखल झालेत. या ठिकाणी त्यांनी पाहणी केली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सध्या औरंगाबादमध्ये आहेत. या घटनेचं गांभीर्य पाहता ते नाशिकला येणार आहेत, अशी माहिती दादा भुसे यांनी दिली.
ज्या ठिकाणी आग लागली आहे. त्या ठिकाणी जाण्यासाठी अडथळा येत आहे. नाशिक मनपा, एमआयडीसी या ठिकाणाहून व्यवस्था होत आहे. सर्व प्रथम आगीवर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे, असं दादा भुसे म्हणाले आहेत.
जिंदाल कंपनीला लागलेली आग ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. प्लॅस्टिक इथे तयार केलं जातं. त्यामुळे या आगीने गंभीर स्वरूप धारण केलं आहे. या आगीची दाहकता आजूबाजूच्या गावांना देखील जाणवली. 14 जण जखमी झालेत आणि एकाचा मृत्यू झाला असल्याची माहिती आहे.
SDRF, NDRF यांना मदतीचं आवाहन करण्यात आलं आहे. लोकांना जीव वाचवणं हे पहिलं कर्तव्य आहे. कुणी जखमी आढळल्यास त्यांना दवाखान्यात नेऊन उपचार करण्याकडे प्रशासनाचा कल आहे, असं भारती पवार म्हणाल्या आहेत.
विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी या घटनेची माहिती दिली आहे. बॉयलरचा स्फोट होऊन ही आग लागली आहे. आग विझवण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न केले जात आहेत. 14 जणांना वाचवण्यात आलं आहे. तर रुग्णालयात उपचारा दरम्यान एका महिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. सध्या आतमध्ये कुणी नसल्याची माहिती आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, असं राधाकृष्ण गमे म्हणाले आहेत.