नाशिक : सीएनजीच्या दरात वाढ सुरूच आहे. नाशिकमध्ये (Nashik) सीएनजी आता आणखी महाग झाला आहे. नाशिकमध्ये सीएनजीच्या दरात (CNG rate) प्रति किलो मागे तीन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. शहरात पूर्वी सीएनजीचे दर प्रति किलो 83 रुपये इतके होते. ते आता प्रति किलो 86 रुपयांवर पोहोचले आहेत. नवे दर आजपासून लागू झाले आहेत. सीएनजीमध्ये झालेल्या दरवाढीमुळे आता नाशिककरांच्या खिशाला कात्री लागणार असून, सीनजीच्या भावात वाढ सुरूच असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सीएनजी, पीएनजी, एलपीजी, पेट्रोल, डिझेल अशा सर्वच प्रकारच्या इंधनामध्ये वाढ झाल्याने महागाईचा (Inflation)भडका उडाला आहे. महागाई गेल्या नऊ वर्षांतील उच्चाकांवर पोहोचली आहे. मात्र अजूनही या महागाईतून नागरिकांना दिलासा मिळताना दिसत नाहीये.
दरम्यान आज नाशिक प्रमाणेच पुण्यात देखील सीएनजीच्या दरात दोन रुपयांची वाढ करण्यात आली आहे. पुण्यात सीएनजीचे दर आता 80 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. गेल्या दीड महिन्यात सीएनजीच्या दरात तब्बल चारवेळा वाढ करण्यात आली आहे. दीड महिन्यापूर्वी सीएनजीचे दर 68 रुपये प्रति किलो होते. त्यानंतर त्यामध्ये पाच रुपयांची वाढ करण्यात आल्याने भाव 73 रुपयांवर पोहोचले. तेव्हापासून वाढ सुरूच आहे. आज पुन्हा दोन रुपयांची वाढ करण्यात आल्याने पुण्यात आता एक किलो सीएनजीसाठी 80 रुपये मोजावे लागणार आहेत.
सीएनजीवर चालणाऱ्या वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सीएनजी, पीएनजीवर आकारण्यात येणाऱ्या व्हॅटमध्ये कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्याबाबत अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात घोषणा देखील केली होती. सीएनजीवर व्हॅट कपात करण्यात आल्याने सीएनजीचे दर सहा रुपयांनी तर पीएनजीचे दर साडेतीन रुपयांनी स्वस्त झाले होते. सीएनजी स्वस्त झाल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला होता. मात्र त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा सीएनजीच्या दरात वाढ झाली.
सीएनजी, पीएनजीचे दर वाढल्याने मार्जीनमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. त्याचा मोठा फटका हा वाहतूक व्यवसायाला बसत आहे. आपल्या पार्टनर ड्रायव्हरला दिलासा देण्यासाठी ओला, उबेर सारख्या कंपन्यांकडून भाड्यात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे. प्रवास महागल्याने त्याचा फटका हा प्रवाशांना बसत आहे. भाड्यासाठी अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत.