उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्र बंदचे आवाहन, कोर्टाच्या आदेशानंतर शरद पवार आणि काँग्रेसने फिरवली पाठ

| Updated on: Aug 23, 2024 | 7:04 PM

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले होते. या बंदबाबत मुंबई उच्च न्यायालयाने हा बंद बेकायदेशीर ठरवला असून कारवाईचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. कोर्टाच्या या निर्णयानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उद्धव ठाकरे यांचे महाराष्ट्र बंदचे आवाहन, कोर्टाच्या आदेशानंतर शरद पवार आणि काँग्रेसने फिरवली पाठ
Uddhav Thackeray Sharad Pawar Nana Patole
Follow us on

बदलापूरमधील दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ उद्धव ठाकरे यांनी 24 ऑगस्टला महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाने कोणत्याही राजकीय पक्षाला बंद करण्याची परवानगी नाही. जर तसा कुणी प्रयत्न केला तर कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश दिले. कोर्टाच्या या निर्णयानंतर शरद पवार यांनी संविधान आणि कोर्टाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्या असं आवानह केलं आहे. तर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही कोर्टाच्या निर्णयाचा आदर करू असं म्हटलं आहे. त्यामुळे शरद पवार आणि काँग्रेसने पाठ फिरवली असून उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

नाना पटोले काय म्हणाले?

उद्या काळा झेंडा आणि काळी पट्टी बांधून दुपारी 11 ते 12 वाजेपर्यंत आम्ही महाराष्ट्रामध्ये सरकारच्या मुस्कटदाबी सरकारच्या धोरणाविरोधात शांततेत बसणार आहोत. आम्हाला कोर्टाने दिलेला निर्णय मान्य असून त्याचा आम्ही आदर करू. सामान्य नागरिक म्हणून आमचे सर्व नेते वेगवेगळ्या भागांमध्ये एक तासांचे आंदोलन करणार आहे. आम्ही कोर्टाचा आदर करून वाटचाल करत आहोत. आम्ही बंद करणार नाही पण लोक स्वयंपूर्तीने बंद करतील तर त्याला आमचा इलाज नाही, असं नाना पटोले म्हणाले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे समाजासाठी नाहीतर राजकारणासाठी जगतात. सातत्याने आमच्यावर राजकीय पोळी म्हणून टीका करतात पण तुम्ही काय करत आहात. जनतेच्या पैशाची उधळपट्टी करून तुम्ही राजकीय पोळी भाजता त्याचं काय? महाराष्ट्राची जनता वाऱ्यावर आहे, मुली सुरक्षित नाहीत याची काळजी त्यांना नाही असं म्हणत महायुती सरकारवर निशाणा साधला.

शरद पवार यांच्याकडून बंद मागे घेण्याचं आवाहन

बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर उद्या 24 ऑगस्ट 2024 रोजी राज्यव्यापी सार्वजनिक बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्या दोन अजाण बालिकांवर झालेला अत्याचार हा अतिशय घृणास्पद होता. परिणामी समाजातील सर्व स्तरांतून याबाबतीत तीव्र लोकभावना उमटल्या. या बाबीकडे सरकारचे लक्ष वेधण्याचा हा प्रयत्न होता. हा बंद भारतीय राज्यघटनेच्या मुलभूत अधिकारांच्या कक्षेत होता. तथापि मुंबई उच्च न्यायालय यांनी सदर बंद घटनाबाह्य असल्याचा निर्वाळा दिला आहे. सदर निर्णयाविरूद्ध सर्वोच्च न्यायालयात तातडीने दाद मागणे वेळेच्या मर्यादेमुळे शक्य नाही. भारतीय न्यायव्यवस्था संविधानात्मक संस्था असल्याने संविधानाचा आदर राखून उद्याचा बंद मागे घ्यावा असे आवाहन करण्यात येते असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.