नाशिक: मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. मी त्यांना अभिवादनही करतो. पण जिथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील तर अशा ठिकामी जाऊन काय करायचे? असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
साहित्य संमेलनात वीर सावरकरांचा यथोचित सन्मान करण्यात आला नाही. त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून हा सवाल केला आहे. मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे. त्यांना मी अभिवादन करतो. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच. पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे?, असा सवाल फडणवीस यांनी केला आहे.
या नगरीला कुसुमाग्रजांचे नाव दिले, याचे स्वागतच. पण केवळ स्वातंत्र्यवीरांचे नाव न देण्याच्या अट्टाहासातून त्यांचे नाव देण्यातून या दोन्ही महनियांची उंची आपण कमी करीत नाही का? असो,आमचे आदर्श, प्रेरणास्थान स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व अजरामर आणि प्रत्येकाच्या मनात आहे, असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे.
केवळ स्वातंत्र्यवीरच नाही, तर साहित्यातील सर्व अंगांनी परिपूर्ण कवी, नाटककार, कादंबरीकार, निबंधकार, पत्रलेखक, चरित्रलेखक, आत्मचरित्र लेखक, व्याकरणकार, पत्रकार, इतिहासकार आणि ज्यांनी मराठीला अनेक शब्द दिले, त्यांचे नाव साहित्यनगरीला न वापरण्याचा हट्ट कशासाठी?, असा सवाल करतानाच नाशिक ही स्वातंत्र्यवीरांची जन्मभूमी आणि कर्मभूमी सुद्धा. अ.भा. मराठी साहित्य संमेलन, अ. भा. मराठी नाट्य संमेलन आणि मराठी पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद सुद्धा त्यांनी भूषविलेले. असे तिन्ही बहुमान मिळालेले कदाचित ते एकमेव आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले आहे.
दरम्यान, फडणवीस हे नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. मात्र, नाशिकमध्ये असूनही त्यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवली आहे. आता तर त्यांनी ट्विट करून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
नाशिकमध्ये होणारे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ना त्या कारणाने सतत वादात आहे. सुरुवातीला निमंत्रक जयप्रकाश जातेगावकर आणि साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले-पाटील यांची वादावादी चांगलीच रंगली. संमेलनाच्या तारखांसाठी खोटी कारणे पुढे का केली म्हणत कौतिककराव ठाले-पाटील यांनी जातेगावकरांना पत्र लिहून सुनावले होते. हा वाद शमतो ना शमतो तोच साहित्य संमेलन गीतामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नावच टाकले नसल्याचे समोर आले. गीतकार मिलिंद गांधी यांनी हे गीत रचले आहे. नाशिकचा सांस्कृतिक आणि साहित्यिक विश्वाचा इतिहास आणि आढावा या गीतातून घेतला आहे. संजय गीते यांनी हे गीत स्वरबद्ध केले आहे. या गीतामध्ये स्वातंत्र्यवीर, नाशिकचे भूमिपुत्र, साहित्यिक आणि मुंबई येथे 1938 मध्ये झालेल्या 23 व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष वि. दा. सावरकर यांच्या नावाचा उल्लेख नव्हता. नाशिकमधील इतर सर्वच साहित्यिकांचा नावासह उल्लेख होता. मात्र, सावरकरांच्या नावाचा उल्लेख जाणूनबुजून टाळल्याची चर्चा होती. त्यावरून सावकरप्रेमी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली होती. अखेर वाढता रोष पाहता संमेलन गीतामध्ये सावरकरांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे संमेलन गीताच्या एका ओळीत बदल करण्यात आला आहे.
मराठी सारस्वतांचा पूर्णत: सन्मान आणि आदर आहे.
त्यांना मी अभिवादन करतो.
अ.भा. मराठी साहित्य संमेलनाला सुद्धा शुभेच्छा आहेतच.
पण… जेथे आमचे आदर्शच अपमानित होत असतील, त्यांचा यथोचित सन्मान होणार नसेल, तर तेथे जाऊन तरी काय करायचे? #साहित्यसंमेलन— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 4, 2021
संबंधित बातम्या:
CCTV | कॉलेजबाहेर विद्यार्थ्यावर सपासप वार, नाशकातील हल्ल्याचा थरार सीसीटीव्हीत कैद
कसोटी आणि वनडे खेळण्यासाठी टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार, टी-20 मालिका स्थगित