नाशिक : शेतमालाला योग्य बाजारभाव नाही, अवकाळी पावसाने थैमान घातलेले असतानाच राज्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे अवकाळी पावसात झालेल्या नुकसानीचे पंचनामे होणार का नाही या चिंतेत शेतकरी असतानाच दुष्काळात तेरावा महिना म्हणावा तशीच अवस्था आता राज्यातील शेतकऱ्यांची झाली आहे.
कारण सध्या द्राक्ष उत्पादक दुहेरी संकटात सापडले आहेत. द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात द्राक्ष काढणीचा हंगाम सुरु झालेला असतानाचा अवकाळी पावसाने थैमान घातले घातले आहे.
तर त्यातच बांगलादेशाने आयात शुल्क अद्यापही रद्द न केल्याने द्राक्षाचे बाजार भाव कोसळले आहेत. द्राक्ष बागायतदार सध्या अवकाळी पावसामुळे मोठ्या संकटात सापडले आहेत. द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांवर आर्थिक संकटात सापडले आहेत.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी कर्जाचा डोंगर डोक्यावर उभा करत थंडीवर मात करत द्राक्षांचे पीक जोमदार घेतले होते. तर आता द्राक्ष काढणीचा हंगाम सुरू झाला असून एका नाशिक जिल्ह्यामधून 38 हजार 20 टन द्राक्ष निर्यात झाली आहे तर संपूर्ण राज्यातून 3 हजार 99 कंटेनरमधून 41 हजार 109 टन द्राक्षांची निर्यात बांगलादेशासह युरोप खंडात करण्यात आली आहेत.
पण या निर्यातीतून एकट्या बांगलादेशात सर्वाधिक निर्यात झाली असून बांगलादेशाने आयात कर लावले असल्यामुळे व्यापारीवर्ग किलोला 15 ते 20 रुपये दर देत असल्याने द्राक्ष उत्पादकांना यापाठीमागे 12 कोटींचा फटका बसला आहे तर दुसरीकडे वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे द्राक्षांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
द्राक्षांवर आता काळ्या बुरशीचा प्रादुर्भाव, द्राक्ष मणी तडकल्याचे चित्र आता सर्वत्र पाहवयास मिळत असल्याने द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीत वाढ झाल्याने घेतलेले कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा यासह अनेक संकटांचा सामना करण्यासाठी कांद्याप्रमाणे आता द्राक्षांनाही अनुदानाची मागणी जोर धरू लागली आहे.