कॅबिनेट मंत्री दादा भुसे यांचा मुलगा अविष्कर भुसे याच्या वाहनावर काही टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केल्याचे समोर येत आहे. भल्या पहाटेच हा प्रकार घडल्याने मालेगाव आणि परिसरात एकच खळबळ उडाली. देवदर्शनाहून येताना काही टवाळखोरांनी हा हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते. याप्रकरणी मालेगाव पोलीस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे. गो तस्करी थांबवण्यासाठी अविष्कार भुसे यांनी प्रयत्न केल्याचे समजते. त्यानंतर हा प्रकार घडला. या प्रकरणी छावणी पोलिसांनी आयशर जप्त केला आहे. त्यातून गायी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत.
गो-तस्करीचा प्रयत्न हाणून पाडला
मंत्री दादा भुसे यांचे चिरंजीव अविष्कार भुसेंच्या वाहनावर टवाळखोरांनी हल्ल्याचा प्रयत्न केला. संशयित गो-तस्कर असल्याचे समोर येत आहे. पहाटे पावणेचार वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याचे दिसून आले. देव दर्शनाहून परतत असताना हा प्रकार घडला. आयशर गाडीत जनावर चोरून नेत असल्याचा संशय आल्याने अविष्कार भुसे यांनी वाहनातून पाठलाग केला होता. याप्रकरणी आरोपींविरोधात मालेगाव छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आयशर वाहन पोलिसांकडून हस्तगत
या प्रकरणी छावणी पोलिसांनी आयशर जप्त केला आहे. त्यातून गायी देखील ताब्यात घेण्यात आल्या आहेत. अचानक घडलेल्या या प्रकारात अविष्कार भुसे यांनी केलेल्या धाडसामुळे गो-तस्करी थांबवण्यात यश आले असून काही गायींची देखील सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
काही महिन्यांपूर्वी मालेगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गोवंश जातीची जनावरं आढळली होती. पोलिसांनी ही जनावरं जप्त करून दाभाडी येथील गो-शाळेत पाठवली होती. बकरी ईदच्या पूर्वसंध्येला संबंधित मालक जनावरे बाजार समितीत सोडून पसार झाल्याचे समोर आले होते. या दिवशी गोवंश जनावरांची खरेदी-विक्री होत असल्याचा आरोप करण्यात येत होता. पोलिसांनी पाळत ठेवल्यानंतर या जनावरांचे मालक जनावरे तिथेच ठेवत बेपत्ता झाले होते. त्यानंतर आता हा प्रकार समोर आला आहे.